वसुंधरा किर्लोस्कर महोत्सवाची नोंदणी सुरू

विद्यार्थी, नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन

वसुंधरा किर्लोस्कर महोत्सवाची नोंदणी सुरू

सोलापूर : प्रतिनिधी

किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची नोंदणी शाळा व महाविद्यालयात करण्याच्या मोहिमेचा शुभारंभ आज मंगळवारी विविध महाविद्यालय व शाळांमध्ये झाला. या मोहिमेस विद्यार्थी प्राध्यापक तसेच शिक्षक वर्गाचा मोठा प्रतिसाद मिळाला.

१६ वा किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १४ ते १७ डिसेंबर दरम्यान होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी हा चित्रपट महोत्सव यंदा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येत आहे. चार दिवसांच्या या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात विविध विषयांवरील सुमारे ७० चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. सकस अन्न, समृद्ध निसर्ग आणि आरोग्यपूर्ण समाज असा यंदाच्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा विषय असणार आहे.

या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी होण्यासाठी महाविद्यालय तसेच शाळांतील विद्यार्थी शिक्षक प्राध्यापक यांना एक लिंक देण्यात येत आहे. ही लिंक वापरून आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वांना ऑनलाइन पद्धतीने सहभागी होता येणार आहे. या महोत्सवात सहभागी होण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे. याकरिता किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या समितीने शाळा महाविद्यालय मध्ये संपर्क करून संवाद साधला. यावेळी मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन नोंदणी करण्यात आली. मंगळवारी वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय मॉडर्न प्रशाला तसेच नूतन प्रशाला येथे विद्यार्थी व शिक्षकांची नोंदणी करण्यात आली. यावेळी वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सचिन गेंगजे, डॉ. शशिकांत हलकुडे, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक प्रा. प्रवीण काथवटे, प्रा. महेश महंत, प्रा. प्रितिष चिट्टे, समन्वयक प्रा. डॉ. नरेंद्र काटीकर, मॉडर्न प्रशालेच्या मुख्याध्यापिका अरुणा कुलकर्णी, पर्यवेक्षिका रागिणी कुलकर्णी, किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीज लिमिटेडचे एच.आर.मॅनेजर ऋषिकेश कुलकर्णी, प्रोडक्शन मॅनेजर दैदिप्य वडापुरकर, ज्ञानेश्वरी टकले आदी उपस्थित होते.

ज्या शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी शिक्षक तसेच एकूणच पर्यावरणाविषयी आस्था असलेल्या ज्या नागरिकांना वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी होऊन विविध विषयांवरील चित्रपटांचा आस्वाद घ्यायचा आहे त्यांनी ज्ञानेश्वरी टकले यांच्याशी सकाळी १० ते सायं. ६ यावेळेत ९११२८९१९७२ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.