सोलापूर मॅरेथॉन होणार ८ जानेवारीला

सोलापूरकरांनी सहभागी होण्याचे आवाहन

सोलापूर मॅरेथॉन होणार ८ जानेवारीला

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर रनर्स असोसिएशनतर्फे रविवार दि. ८ जानेवारी रोजी आपटे डेअरी प्रायोजित सोलापूर मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले असून यंदाच्या मॅरेथॉनमध्ये कचरा विलगीकरणसाठी जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. स्वप्नील कोठाडीया आणि आपटे डेअरीचे अभिषेक आपटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.


२१ किलोमीटर, १० किलोमीटर आणि ३.५ किलोमीटरची फन रन अशा तीन गटात ही मॅरेथॉन होणार आहे. दरवर्षी वेगवेगळी थिम घेवून सोलापूर मॅरेथॉनचे आयोजन करण्यात येते त्यानुसार यंदाच्या मॅरेथॉनमध्ये नागरीक तसेच शहरवासियांनी ओला आणि सुका कचरा विलगीकरण कसे केले पाहिजे, त्यापासून कसा फायदा आहे, याबाबतची जनजागृती करण्यात येणार आहे.

मॅरेथॉनमध्ये सहभागी स्पर्धकांना टी शर्ट, टाईम बीब, गुडी बॅग, सहभागी मेडल असे साहित्य पुरवण्यात येणार आहे तसेच मॅरेथॉनच्या मार्गावर पाणी, एनर्जी ड्रिंक, नाष्टा, तज्ञ डॉक्टरांची टीम आणि रुग्णवाहिका तसेच महिलां मुलींसाठी बायो टॉयलेटची सुविधा करण्यात येणार आहे.  सोलापूर मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी www.solapurmarathon.com   या वेबसाईटवर नाव नोंदणी करणे आवश्यक असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

मॅरेथॉनचा मार्ग आणि वेळ - 
२१ किलोमीटरचा मार्ग - 
ज्ञानप्रबोधीनी प्रशालेपासून सकाळी ५.४० वा. सुरूवात, डफरीन चौक, जुना एम्प्लायमेंट चौक, सातरस्ता, पत्रकार भवन, विजापूर नाका, आयटीआय चौक, भारती विद्यापीठ, डी मार्ट, टाकळीकर मंगल कार्यालय, विजयपूर रोड मार्गे एसआरपीएफ मैदानापासून माघारी येवून पुन्हा त्याच मार्गाने ज्ञानप्रबोधीनी प्रशालेसमोर समारोप होईल.

१० किलोमीटरचा मार्ग -
ज्ञानप्रबोधीनी प्रशालेपासून सकाळी ६ वा. सुरूवात, डफरीन चौक, जुना एम्प्लायमेंट चौक, सातरस्ता, पत्रकार भवन, विजापूर नाका, आयटीआय चौक, भारती विद्यापीठ, जुळे सोलापूर संतोष नगर येथून माघारी येऊन पुन्हा त्याच मार्गाने ज्ञानप्रबोधीनी प्रशालेसमोर समारोप होणार आहे. 

 
३.५ किलोमीटरची फन रन मार्ग -

ज्ञानप्रबोधीनी प्रशालेपासून सकाळी ७.३० वा. सुरूवात, डफरीन चौक, जुना एम्प्लायमेंट चौक, सातरस्ता येथून पुन्हा त्याच मार्गाने ज्ञानप्रबोधीनी प्रशालेसमोर समारोप होणार आहे.


गेल्या ६ वर्षांपासून सोलापूर रनर्स असोसिएशनच्यावतीने सोलापूर मॅरेथॉन होत आहे. कोरोनाच्या दोन वर्षांच्या काळातही नागरीकांना ऑनलाईन पध्दतीने व्हर्च्युअल मॅरेथॉनचे आयोजन करून शरीर सदृढ ठेवण्यासाठी विशेष मॅरेथॉन घेण्यात आली. कोरोना नंतरची ही मॅरेथॉन म्हणजे पुन्हा नव्याने सुरूवात आहे. यात मोठ्या संख्येने नागरिकांना सहभागी होता यावे याकरिता नावनोंदणी केली जात आहे. 


आंतरराष्ट्रीय दर्जाची सोलापूर मॅरेथॉन यंदा सोलापूरमधील सुप्रसिध्द सराफ व्यापारी आपटे यांनी नव्याने सुरू केलेल्या आपटे डेअरी या नव्या उद्योगाच्या सहकार्याने होणार असल्याने आपटे डेअरी सोलापूर मॅरेथॉन या नावाने ही मॅरेथॉन होणार आहे.


सोलापूर महानगरपालिकेच्या या जनजागृतीत सोलापूर रनर्सचाही सहभाग राहणार आहे. यापुर्वी सोलापूर रनर्स असोसिएशनने स्वच्छतेवर आधारीत उपक्रम राबवला होता. त्यानंतरच्या मॅरेथॉनमध्ये हरित सोलापूर ही संकल्पना राबवून वृक्ष लागवडीचा उपक्रम राबवला. सोलापूर मॅरेथॉन ज्या मार्गावरून होते तो मार्ग आंतरराष्ट्रीय मानांकना प्रमाणे असून या मार्गावरील दोन्ही बाजुला सोलापूर रनर्स असोसिएशनच्यावतीने वृक्षारोपण करून त्यांचे संगोपन करण्यात आले आहे.


गेल्या ६ वर्षांपासून सोलापूर मॅरेथॉन यशस्वी करण्यासाठी पोलीस आयुक्तालय, सोलापूर महानगर पालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, आरटीओ कार्यालय, आरोग्य विभाग वाहतुक विभाग, हरिभाई देवकरण प्रशाला, नूमवि प्रशाला यांचे विशेष सहकार्य लाभले आहे, असे डॉ. कोठाडिया यांनी सांगितले.


सोलापूर मॅरेथॉन यशस्वी करण्यासाठी सोलापूर रनर्स असोसिएशनचे 
अध्यक्ष डॉ. स्वप्नील कोठाडीया, कार्याध्यक्ष डॉ. विश्वास बिराजदार, खजिनदार डॉ. योगेश जडे, रेस डायरेक्टर डॉ. विक्रम दबडे, माजी अध्यक्ष डॉ. यशवंत पेठकर, डॉ. विनायक देशपांडे, डॉ. विवेक कुलकर्णी, डॉ. भास्कर पाटील, डॉ. नितीन बलदवा, डॉ. गोरख रोकडे, डॉ. गुरू जालीमिंचे, डॉ. किरण किणीकर, डॉ. महेश बिलुरे, डॉ. प्रदीप भोई, डॉ. सुभाष भांगे, अभय देशमुख, अजित वाडेकर, बसवराज, संजय सुरवसे, जयंत होलेपाटील, श्रीनिवास संगा, स्वप्नील नाईक, रोषण भुतडा, ओंकार दाते, डॉ. विठ्ठल कृष्णा आदी परिश्रम घेत आहेत.

या पत्रकार परिषदेस आपटे ग्रुपचे आल्हाद आपटे, विकास पवार, कार्याध्यक्ष डॉ. विश्वास बिराजदार, खजिनदार डॉ. योगेश जडे, रेस डायरेक्टर डॉ. विक्रम दबडे, माजी अध्यक्ष डॉ. यशवंत पेठकर, डॉ. नितीन बलदवा, डॉ. किरण किणीकर, ओंकार दाते आदी उपस्थित होते.

---------

टी शर्टचे झाले अनावरण

सोलापूर मॅरेथॉनच्या टी शर्टचे अनावरण पत्रकार परिषदेत करण्यात आले. धावपटूंच्या सोयीसाठी विशेष विचार करुन हे टी शर्ट बनविण्यात आल्याचे डॉ. स्वप्निल कोठाडिया यांनी यावेळी सांगितले.