मुख्यमंत्रीपदाच्या नावावर झाले शिक्कामोर्तब ?
काय असू शकतात कारणे ? : विश्लेषण
पुरुषोत्तम कारकल
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. खाते वाटपावर सुरू असलेल्या चर्चेमुळे मुख्यमंत्री पदाच्या नावाची घोषणा लांबल्याचे सांगण्यात आले.
लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झालेली फटाफूट, भाजपाच्या आरोपानुसार झालेला वोट जिहाद, संविधान बदलाचा पसरविण्यात आलेला नरेटिव्ह, अंतर्गत कलह अशा अनेक मुद्द्यांमुळे भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीला लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसला. यातून धडा घेत महायुतीने विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळवले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नेतृत्वाखाली झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला यश मिळाले खरे. परंतु आता सर्वांच्या नजरा मुख्यमंत्री पदाकडे आणि इतर महत्त्वाच्या खात्यांकडे लागल्या आहेत.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या भाजपाच्या शीर्षस्थ नेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे सांगण्यात आले. यंदाच्या निवडणुकीत सर्वाधिक जागा भाजपच्या आल्यामुळे भाजपचा मुख्यमंत्रीपदावर असलेला स्वाभाविक दावा, आजवरचा अनुभव पावता भाजपची पक्ष विस्ताराची असलेली महत्त्वकांक्षा, मोदी आणि शहा जो निर्णय घेतील तो शिवसेनेला मान्य असेल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले स्पष्टीकरण यामुळे भाजपाचा मुख्यमंत्री होणार हे आता पुरते स्पष्ट झाले आहे.
तथापि, विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच मुदतवाढ देऊन किमान पुढील अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद शिवसेनेला द्यावे याकरिता शिवसेना आग्रही असल्याचे बोलले जाते. शिवसेनेच्या एकाच वेळी तब्बल ५० आमदारांना सोबत घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेवर दाखविलेली निर्विवाद पकड, विरोधी बाकांवर बसलेल्या भाजपा आमदारांना सत्ताधारी बाकांवर बसविण्यासाठी एकनाथ शिंदे यांची झालेली मदत, सत्ता स्थापनेपासून विधानसभा निवडणुकीपर्यंत राज्यात स्थिरपणे राबवलेले सरकार, विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या मोठ्या यशात असलेला मोठा वाटा या कारणांमुळे मुख्यमंत्रीपद शिवसेनेला आणि अर्थातच एकनाथ शिंदे यांना मिळावे असा शिवसेनेचा आग्रह आहे.
दुसरीकडे, मुख्यमंत्री पदासाठी भाजपाकडून देवेंद्र फडणवीस यांच्या नावासोबतच विनोद तावडे, मुरलीधर मोहोळ अशा नावांची चर्चा सुरू आहे. समाज माध्यमातून विविध चर्चा झडत असल्या तरीही पुढील कारणांमुळे मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांचीच वर्णी लागेल अशी चिन्हे आहेत. जाणून घ्या काय आहेत कारणे :-
१) विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा भाजपाला मिळण्यात मोठा वाटा.
२) संपूर्ण राज्याचा असलेला राजकीय आवाका.
३) आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बारकाव्यांचा, तेथील (विशेषतः राजकीय) समस्यांचा आणि उपाययोजनांचा असलेला अभ्यास.
४) एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात समन्वय ठेवून राज्य चालवण्याचा अनुभव.
५) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्राधान्यक्रमात असलेले नाव.
६) बहुसंख्य भाजपा आमदारांची, पदाधिकाऱ्यांची नावाला असलेली पसंती.
या मुद्द्यांमुळे राज्याच्या मुख्यमंत्रीपदासाठी दिल्लीतून देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित होण्याची अधिक शक्यता आहे. गृह, नगर विकास आणि वित्त खाते महायुतीतील कोणत्या पक्षाकडे राहणार या प्रश्नावरील चर्चेमुळे मुख्यमंत्री पदाचे नाव जाहीर करण्यास विलंब लागत असल्याचे सांगण्यात आले. तथापि, अपवाद वगळता आजवरच्या देशभरातील विविध राज्यातील विधानसभांच्या राजकारणाचा इतिहास पाहता ज्या पक्षाकडे मुख्यमंत्रीपद येईल त्याच पक्षाने गृहमंत्रीपद देखील स्वतःकडे ठेवल्याचे दिसते. त्यामुळे भाजप मुख्यमंत्रीपदासह गृह आणि वित्त खातेही पदरात पाडून घेणार की महायुतीतील मित्रपक्षांचा सन्मान ठेवण्यासाठी नवी प्रथा सुरू करणार हे काही तासांमध्येच स्पष्ट होणार आहे.