विठू नामाचा गजर, श्री सिद्धरामेश्वरांना वंदन अन् विकासाचे वचन.....

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जिंकली सोलापूरकरांची मने : महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा उत्साहात

विठू नामाचा गजर, श्री सिद्धरामेश्वरांना वंदन अन् विकासाचे वचन.....

सोलापूर : प्रतिनिधी

कार्तिकी एकादशीच्या मुहूर्तावर सभेसाठी सोलापुरात आल्यानंतर केलेला विठू नामाचा गजर, श्री सिद्धरामेश्वर आणि महात्मा बसवेश्वर महाराज यांना केलेले वंदन आणि विकासाचे दिलेले वचन यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापूरकरांची मने जिंकली. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मंगळवारी होम मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पार पडली.

यावेळी व्यासपीठावर खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, भाजपा प्रदेश संघटनमंत्री रघुनाथ कुलकर्णी, माजी खासदार डॉ. जयसिध्देश्वर महास्वामी, महायुतीचे उमेदवार विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, राम सातपुते, सचिन कल्याणशेट्टी, समाधान आवताडे, राजेंद्र राऊत, यशवंत माने, देवेंद्र कोठे, मीनल साठे, दिग्विजय बागल, भाजपाचे शहर अध्यक्ष नरेंद्र काळे, भाजपाचे माजी शहर अध्यक्ष विक्रम देशमुख, माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे,  शिवसेना जिल्हाप्रमुख मनिष काळजे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, प्रदेश कार्याध्यक्ष किसन जाधव, भाजपा जिल्हा सरचिटणीस शशिकांत चव्हाण, आर.पी.आय (ए) चे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे, दौलत शितोळे, भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश सचिवा रंजीता चाकोते उपस्थित होते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, विठुरायाची भूमी, विठोबाचे सानिध्य आणि ही सभा केवळ योगायोग नाही तर पुढील पाच वर्षांच्या सेवेचा आशीर्वाद आहे. दशकांपासून सोलापूरकर करीत असलेल्या विकासाच्या मागणीची पूर्तता महायुतीने केली. सोलापूरच्या चारही दिशेने राष्ट्रीय महामार्ग, वंदे भारत रेल्वे आणि इतर अनेक विकासकामे केंद्राच्या भाजप सरकार आणि महाराष्ट्राच्या महायुतीच्या सरकारमुळे शक्य झाले. महाराष्ट्राला पुढील पाच वर्षे स्थिर सरकारची गरज आहे. स्थिर सरकारच महाराष्ट्रासाठी दुरगामी नीती बनवू शकते. ज्या महाविकास आघाडीत निवडणूक होण्याआधीच भांडणे पेटली आहेत ती महाविकास आघाडी महाराष्ट्राला स्थिर सरकार देऊ शकत नाही, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. "भाजपा महायुती आहे तर गती आहे महाराष्ट्राची प्रगती आहे." असे वाक्य मोदी यांनी मराठी भाषेतून उच्चारताच उपस्थित त्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.

सोलापुरात बनणाऱ्या चादरी, गणवेश, शिलाई कामगार यांचा उल्लेख करत येथील उत्पादनांचा आणि कामगारांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गौरव केला. टेक्स्टाईल पार्क मुळे येथील उत्पादने देश विदेशात पोहोचणार आहेत असे त्यांनी सांगितले. महायुती सरकार महिलांना केंद्रबिंदू ठेवून काम करत आहे. महिलांच्या सशक्ती करण्यासाठी महायुती कटिबद्ध आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे अनेक बहिणींची दिवाळी अधिक आनंदात गेली. यातून अर्थव्यवस्थेलाही ताकद मिळाल्याचे निरीक्षण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोंदवले.

काँग्रेस दलित वंचित आदिवासी आणि इतर जातींना छोट्या छोट्या तुकड्यात विभागण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेसच्या या भयंकर षडयंत्रला बळी न पडता सर्वांनी एक राहणे आवश्यक आहे, असे सांगत 'एक है तो सेफ है', 'बटेंगे तो कटेंगे' चा नारा यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला.

------------

घोंगडी, काठी अन् तुळशीचा हार 

याप्रसंगी शहराध्यक्ष नरेंद्र काळे आणि जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घोंगडी, काठी, तुळशीचा हार आणि पगडी देऊन सन्मानित करण्यात आले. या अनोख्या स्वागतामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदीही आनंदून गेले.