शाब्बास !.....अन् 'त्याने' वाचवला महिलेचा जीव

सीसीटीव्ही मध्ये कैद झाली दृश्ये : पहा व्हिडिओ

शाब्बास !.....अन् 'त्याने' वाचवला महिलेचा जीव

सोलापूर : प्रतिनिधी

स्थळ ....सोलापूरपासून जवळच असलेले घोडेश्वर.... हॉटेलमध्ये आलेल्या एका महिलेचे हृदय अचानक बंद पडले... आणि एकच धावपळ उडाली. इतक्यात दयानंद महाविद्यालयात शिकणाऱ्या एका बहाद्दर तरुणाने पुढे होत त्या महिलेच्या जीव वाचविला. संतोष पाटील या बहाद्दर तरुणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दयानंद महाविद्यालयात कला शाखेच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेणारा संतोष पाटील हा तरुण शुक्रवारी घोडेश्वर येथील एका हॉटेलवर नाश्ता करण्यासाठी थांबला होता. एनसीसी कॅडेट असलेला संतोष प्रजासत्ताक दिन जवळ आल्यामुळे परेडचा सराव करण्यासाठी दयानंद महाविद्यालयाकडे एनसीसीच्या गणवेशातच निघाला होता. घोडेश्वर येथे नाश्ता करण्यासाठी तो थांबला असताना त्या हॉटेलमध्ये अचानक एक महिला बेशुद्ध होऊन कोसळली. त्या महिलेला त्रास होऊ लागल्याने सर्वांचीच धावपळ उडाली. मात्र हृदय बंद पडल्यानंतर कोणते प्राथमिक उपचार द्यावेत याचे प्रशिक्षण एनसीसी शिबिरात घेतलेल्या संतोष पाटील या विद्यार्थ्याने कार्डियाक अरेस्ट चा हा प्रकार असल्याचे ओळखले. त्याने क्षणाचाही विलंब न लावता त्या महिलेला सीपीआर (कार्डियोपल्मोनरी रिससिटेशन) दिला. अत्यंत तत्काळ प्रतिसाद देत संतोष पाटील याने सीपीआर दिल्यामुळे त्या महिलेची बंद पडलेली हृदयक्रिया पुन्हा सुरू झाली आणि जीव वाचला. यावेळी उपस्थित त्यांनी संतोष पाटील यांचे कौतुक करत त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. 

एनसीसी ३८ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल विक्रम जाधव, दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव महेश चोप्रा, प्र. प्राचार्य डॉ. विजयकुमार उबाळे, प्रा. कॅप्टन होनमाने यांनी सत्कार करीत कौतुक केले.
----------------
हृदयरोग तज्ज्ञ डॉ. प्रमोद पवार म्हणतात...

सीपीआर (कार्डियोपल्मोनरी रिससिटेशन) म्हणजे हृदय बंद पडल्यानंतर त्या व्यक्तीच्या हृदयावर हाताने दाब देऊन हृदयाचे पंपिंग बाहेरून चालू करण्यासाठीचे प्रयत्न करणे. सीपीआर हा हृदय बंद पडल्यानंतर रुग्णाला रुग्णालयात नेईपर्यंतचा अत्यंत महत्त्वाचा प्राथमिक उपचार आहे. संतोष पाटील या विद्यार्थ्याने अत्यंत योग्य वेळेत सीपीआर दिल्यामुळे संबंधित महिलेचे प्राण वाचू शकले. जागरूक नागरिक म्हणून त्याचे अभिनंदन !
--- डॉ. प्रमोद पवार, हृदयरोग तज्ञ, सोलापूर 

ही घटना दृश्य सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.

पहा व्हिडिओ :