वाडिया हॉस्पिटलमध्ये आणखी ३५० बेडची करणार सोय

शहरातील सर्व रुग्णालये झाली फुल्ल

वाडिया हॉस्पिटलमध्ये आणखी ३५० बेडची करणार सोय

सोलापूर : प्रतिनिधी

कोरोनाचे वाढते रुग्ण आणि शहरातील फुल्ल झालेली बहुतांश सर्व रुग्णालये या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने वाडिया हॉस्पिटलमध्ये ३५० बेडची सोय करून रुग्णांवर उपचार करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनी 'महाबातमी न्यूज पोर्टल' ला दिली.

मागीलवर्षी कोरोनाची महामारी आल्यानंतर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयातील 'ए' ब्लॉकमध्ये कोविड रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले होते. मात्र रुग्ण संख्या वाढल्याने 'बी' ब्लॉकमध्ये १०० आणि 'सी' ब्लॉकमध्ये ३५ अशा ३०० रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. मात्र हे सर्व ३०० बेड रुग्णांनी भरून गेले आहेत. अशातच बेड नसल्याने दररोज २० ते २५ रुग्ण परत जात असल्याचे चित्र आहे.

दुसरीकडे शहरातील बहुतांश सर्व रुग्णालयेही फुल्ल झाली आहेत. एकही बेड मिळणे अशक्य बनले आहे. अशा परिस्थितीत जिल्हा प्रशासनाने वेगाने पावले उचलत वाडिया हॉस्पिटलमध्ये आणखी ३५० बेडची सोय करण्याचा निर्णय घेतला आहे.

यासाठी शासनाची समिती पुण्याहुन येणार असून ही समिती पाहणी करून अंतिम निर्णय घेणार आहे. त्यानंतर वाडिया हॉस्पिटलमध्ये ३५० कोविड रुग्णांवर उपचार करणे शक्य होणार आहे.

ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा

शहरातील बहुतांश रुग्णालयांत ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. अनेक कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासते. ऐनवेळी ऑक्सिजन संपत आला तर अशावेळी रुग्णालयांतील डॉक्टर, कर्मचाऱ्यांची धावपळ उडते. अशावेळी इतरत्र ठिकाणहून आणून रुग्णांना ऑक्सिजन पुरवला जात आहे. मात्र येत्या काही दिवसांत रुग्णसंख्या अशीच राहिली किंवा दुर्दैवाने वाढली तर ऑक्सिजन साठ्याचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

रोज ३० मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज 

सध्या सोलापूरला दररोज ३० मेट्रिक टन ऑक्सिजन लागतो. आणि पुरवठा २६ मेट्रिक टन ऑक्सिजनचा होत आहे. बेल्लारी आणि चेन्नई येथून ऑक्सिजन आणला जात आहे. या पुरवठ्यात वाढ होण्याची आवश्यकता आहे.

ऑक्सिजन अभावी रुग्णाला घेण्यास असमर्थता

गुरुवारी एका खासगी रुग्णालयात बार्शीहून एक रुग्ण आणण्यात येणार होता. त्या रुग्णाची ऑक्सिजन पातळी ८० पर्यंत घटल्याने रुग्णाला तत्काळ बार्शीतील त्या रुग्णालयातून ऑक्सिजन बेड असलेल्या रुग्णालयात दाखल करणे अत्यावश्यक असताना रुग्णाला २० लीटर ऑक्सिजन लावावा लागू शकतो त्यामुळे आम्ही तितका ऑक्सिजन पुरवठा नसल्याने आम्ही असमर्थ आहोत असे सांगत रुग्णालयाने रुग्ण दाखल करून घेण्यास नकार दर्शविला. त्यामुळे ऑक्सिजन पुरवठा त्वरित सुरळीत करणे गरजेचे बनले आहे.