प्रा. ए. डि. जोशी सर : क्षितिजा पल्याडचा 'काव्ययोगी'
अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त कवी देवेंद्र औटी यांच्या शब्दभावना
सत्कवीचे काव्य दिक्लांच्या मर्यादा ओलांडून पल्याड जाते .कवीचे एकूणच व्यक्तिमत्व त्याचा मूळपिंड अंतरातील व्याकुळता व काकुळती त्याची खोल अनुभव सिद्ध अनुभूती त्याचा व्यासंग जाण आणि भान हे सार त्याच्या काव्यात उमटतं. हेच" शब्द पडसाद" मग त्या कवीचे" हटके' वेगळेपण नजरेत भरून आणि भारून टाकायला सहाय्यभूत ठरतं .
"यत्त स्वभाव: कविस्थ दनुरूप काव्यमा'"
असं वचन संस्कृत मध्ये येतं .त्याचे ज्वलंत उदाहरण हा कवी देऊन जातो. व्यापक जीवनदृष्टीकोन, सकारात्मक अध्यात्मकतेची बैठक ,निश्चल सुंदर, एकांतशील ,धीर आणि गंभीर शांत निर्मळ जलाशयातील सरोवराचा अमृतमयी शब्दजल तुषार्त मानवधर्माला तोषवीत .आपलं लक्ष वेधून घेतो. जेव्हा त्याच्या पवित्र मुखातून पसायदानाची याद देऊन जाणाऱ्या कविता प्रसविल्या जातात. आणि मग या संभ्रमावस्थेच्या काळातही झुंजायला वाचकांना दहा हत्तीचे बळ येतं. कवीच हेच यश ठरतं. सर्वसामान्य माणसांना हतबलता झटकून जीवनदायी प्रेरणा देत. "सायली "मय मायेची सावली देत समर्थ घडवीत. त्याच्या काळया ढगांनी झाकाळुन गेलेल्या आयुष्याला सारे "शूभंकर" होणार आहे .अशी आश्वासकता देत माणूस माणुस उभा करत. पर्यायाने निर्भय समाज उभारणीला चालना मिळते. म्हणूनच काळाच्या मर्यादा ओलांडून ती कविता जाते असं मी प्रारंभीच म्हणलं आहे. त्याची प्रचिती यायला लागते. वानगी दाखल
_"मुखावरी असावे मधुर हास्य अक्षय/ जिभेवर असावी गोडवाणी अक्षय/
नजरेत असावा धुंद ओलावा अक्षय/ अंतकरणी असावे गहिरे प्रेम अक्षय/
करण्या संकटांचा सामना अंगी असावे धैर्य अक्षय/
असेल सारे हे अक्षय सुख समाधान तुमच्या जीवनी राहील अक्षय//
माणसाच्या अंगी उपरोक्त सार असेल तर माणूस कोणी का असेना कुठल्याही क्षेत्रातला असो तो सुखी राहील. हे" समाधान सूत्र "अल्प अक्षरात या कवीने मांडल आहे .या कवीने मागे अतोनात दुःख ,भोग वेदना ,अवहेलना याचे "हलाहल "या कवीने सहज पचविले आहे. तरीही कुणाला दुषण देणे ,आकांत तांडव, आक्रसताळेपणा करणं .स्वतःच सतोम माजवण .असे अघोरी काही न करता, "आधी केले मग सांगितले" या उक्तीनुसार या कवीच्या जगण्याशी व शब्दांशी प्रतारणा कुठेही औषधालाही सापडत नाही .कारण मुळातच हा कवी वर्तमानपत्री "पुरस्कारळेपण" धिक्कारतो .प्रचारकी , उथळ, सवंगतेचा तिरस्कार असणारा .प्रत्यक्ष जीवनाने छळले जाण्याच्या काळातही मी मी म्हणणारे कापटय ,धूर्त, मतलबी कोणाच्यातरी पुढे पुढे करीत सतत मिरवलेपणाच्या आहारी जाऊन सवंग, बटबटीत ,बंगरूळपणाचा आधार घेत अनेक शिक्के मारून घेतात. मात्र हा कवी दुःखाने चोहोबाजूने फेर धरला असतानाही ,सत्यम, शिवम, परोपकार, मांगल्य या सदाचरणी मार्गाने लक्ष्मी सह सरस्वतीला आपल्या पुढ्यात दत्त म्हणून उभा टाकायला प्रवृत्त करतो. आणि सहजगत्या संतांच्या प्रभावळीत आपसूक जाऊन बसतो. मग आणि मगच अशा भावविभोर कवितांचा उद्गगाता, त्राता आणि पिता निसर्ग नियमाने होतो .असा हा विदगत कवी प्रतिभेला विविध शैलीची, अनुभवाची जोड देऊन तिला नटवतो. अंतर्मुख विलक्षण प्रासादिकतेला तपश्चर्याची संगत लाभल्यावरच तर सिद्धी प्राप्त होते ना? चोहोबाजूने ऊठवळ प्रसिद्धीच्या बजबजपुरी पासून कोसोमैल लांब राहून "'अभ्यासे प्रगटावे" या तत्त्वानुसार या कवीच आगळ वेगळेपण मोहक वाटतं .माझ घ्या ..माझ घ्या ..म्हणत काहीही बिरुद स्वतःच्या नावामागं स्वतःचं लावून घेऊन कुठल्या गल्लीबोळातल्या पुरस्कारासाठी कुठल्याही मार्गाने "मॅनेज" करणे .या हीन आणि दिन पातळीला कवितेला नेऊन ठेवू पाहणाऱ्यांची दलदल आपण रोज पाहतोय ."जो मांगोगे वही मिलेगा' नुसार कविता टनाने पाडणारे कुठं. आणी मनाने एखादीच कविता तरारून येणे कुठ. आणी थेट राष्ट्रगीत होणं कुठं. "कवीपण "मिरवण्यासाठी नव्हे ,तर समाजाच्या सृजन उत्थानासाठी व काहीतरी "पुढीलांसाठी" पेरण्यासाठी .कवीपण स्वतःपुरतं मर्यादित असाव. असं पूर्वसुरींनीही सांगून ठेवलं आहे ना?
"आपले थोर पण सोडावे, व्युत्पत्ती विसरावी विनम्रता अंगी बनवावी'".आपल्यापेक्षा धाकल्यांना पुढे घालावे .डोईवर सर्वांना मिरवावे.
असं म्हणणारा हा कवी. प्रासादिक काव्यापासून ते लावणीपर्यंत मुशाफिरी करतो .हेच मुळात नवलाचे वाटतं .शब्द कळाही आतून प्रसवली जाते ."साधो शब्द साधना किजै"अस कबीराने उगाच नाही महणल. "स्वयंभू कवी "हा दुःखालाही दुःख होईल असं भोगून तावुन सुलाखुन निघतो .मगच लिहित होतो .
"भाकरी म्हणते मानवा सहन केले चटके धगधगते ज्वालांचे/
भूक भागविली तुझी/
खालून वरून फुगलेली मी /
वस्त्र म्हणे मानवा ऊन पावसाचा मारा सहन केला रात्रंदिन/
रक्षण करणया तुझे/
कातडी पूर्ण जिर्ण झाली /
नि घर म्हणे मानवा पिढ्यानपिढ्या माझ्या आधारे जगल्या/
तुला आसरा दिला साऱ्यांना//
जरी मोडकळीस आलो मी/ अन्न ,वस्त्र ,निवारा गरजा तुझ्या भागविल्या//
पण तू कसा रे मानवा? घाबरतोस ,कोलमडतोस संकट आणि साध्या साध्या दुखाने/
जाणीव ठेव आमुची दाखव तुझी मनशक्ती//"
अशा कवितां मधून भाकरी, वस्त्र, घर यांना बोलते करून दैनंदिन गरजेच्या बाबींमधून अचूक कल्पक रूपक योजना योजून ,मोजून सोप्या शब्दात मानवी मनाशी अर्थात कोलमडलेल्या माणसांना उभारी देण्याचं अवघड काम हा अवलिया करतो. तेव्हा या कवीची "ऊंची "लक्षात येते. याला मग हा "काव्य दस्तऐवज" घेऊन कोणालाही यासाठी त्यासाठी" शब्द टाका" चे गुप्त मिनतवारी , कसरत असल्या टाकाऊ उचापती करण्याची गरजच उरत नाही. अशा "बाप कविता ""लेकुरवाळ्या कविता" प्रसवण्यासाठी आईचं काळीज लागतं. या कवीला पाहता क्षणी एक आपलेपण जिव्हाळ्याचं, आदर्श ,खानदानी ,तेजपुंज जिवहाळयाच ,आश्वासकतेचे दर्शन होतं. निरलेप, निकोप मनोवृत्तीची मर्मदृष्टी लाभलेला हा कवी वर लिहिल्याप्रमाणे दुःखाचे भांडार उपसून त्याला पुरून उरला आहे.
इतरांसारखा कुठेतरी थोडं बहूत भोगलं न भोगल त्याचा गवगवा करीत सर्वांना दुषंण देत, द्वेष करीत सुटतो .तसा हा कवी म्हणतो "कुणाचातरी द्वेष करणे यासारखी हार नाही, आणि सर्वांना भूषण मानणं यासारखी जीत नाही.'" मात्र हे संत दिलानं आचरणात आणण्यासाठी आई-वडिलांचे संस्कारही लागतात
हे निश्चित .कळपाची गरज तर प्राण्यांना .प्राणीमात्रावर दया करणाऱ्याना एकटाच असावं लागतं. हा नियमच आहे म्हणतात. संत ज्ञानदेव ,संत तुकाराम महाराज, प्रभू येशु, श्रीकृष्ण ,भगवान बुद्ध असे कोणीही घ्या हे दुःख भोगताना एकटेच होते .आभाळाएवढे वेदना ,मानहानी दुःख भोगूनही त्यांनी सूड ,बदला अशा घणास्पद बाबींना धूतकारुन सकलांसाठी पसायदान मागितल्याचा इतिहास आहे .मनातच करुणा नांदत होती. म्हणूनच या कवीचे आत्मचरित्र वाचताना डोळे भरून येतात .अगदी कुणाचेही. "आधी बीज एकले "चा काव्य आविष्कार घडविणारा हा कवी आपल्या बालपणणी मरणप्राय यातना भोगतो .आई-वडिलांचे दुःख पाहतो. आपल्या अर्धांगिनीचा आजार. त्यांचं जाणं दे माय धरणी ठाय. असं एक ना दोन शेकडो अंगावर शहारे आणणारे प्रसंग. अन्नासाठी तुटणारा तो बाल जीव .अंगावरच्या धडुत्यासाठी प्रेताच्या कापडाची गरज पडावी ही राक्षसी परिस्थिती उभा करते .ऐन तारुण्य अवस्थेत सारे फिदीफिदी हसतात .हा कोवळा युवक मूकपणे या जगाचे भेद पाहतो .आई-वडिलांची हतबलता पाहतो. आणि ठरवतो या क्रूर परिस्थितीच्या छाताडावर पाय ठेवून उभा राहीन. नुसता एकटा नव्हे, हजारोंना उभा करीन .आणि तो एक असिधारा वत स्वीकारतो. सरस्वतीच्या सेवेचा वसा घेत घेत लक्ष्मी त्याच्या दारात उभारते. लौकिक सर्वत्र होतो. तरी हा कवी "मज पामरासी काय मोठेपण" म्हणत मवाळ सात्विकतेचा वस्तू पाठ "अमोल "विचाराने देतो. स्वतःच्या देशाचे प्रेम दाखविण्यासाठी स्वतःच नव्हे तर देशाच्या नावाचं "मॉडेल "पुढे आणतो. शून्यातून जग निर्माण करणारे कोणी असतीलही. मात्र यांच्याकडे शून्यही नव्हतं. ते काय असतं, कुठे असतं तेही माहित नव्हतं. अशा या कवीने धीरोदत्ततेने देशाच्या नावाने शैक्षणिक मॉडेल अतिशय कष्टाने ,प्रगाढ अभ्यासाद्वारे नावा रुपाला आणलं की ,ज्या संस्थेच्या माध्यमातून शिक्षण घेऊन हजारो विद्यार्थी देश परदेशात विविध क्षेत्रात देशसेवा पार पाडत आहेत. या संस्थेद्वारे शेकडो शिक्षक, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी यांचे जीवनचरितार्थ चालतो आहे .हा कवी अनेक सामाजिक ,सांस्कृतिक, शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून जनजागरण विविध उपक्रमातून राबवितो आहे .वृद्धाश्रम ही आपल्या कक्षेखाली आणून त्यांना माया प्रेम
देतो आहे. त्यांचा चरितार्थ चालवतो आहे. एकूणच सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नांशी ,भावनांशी तादात्म पावुन त्यावर आपल्या परीने हळुवार फुंकर घालतो आहे. त्यांच्या एकूणच" मानवी जीवन मॉडेल "वर मोठा ग्रंथ होऊ शकेल .सिनेमा सुद्धा होऊ शकेल .जो पुढील पिढ्यांसाठी दस्तऐवज होऊ शकेल .मात्र याकडे व" क्षितिजा पलीकडे "या मनाला घायाळ करणाऱ्या दुःखांचे आघात पचवित मन शक्ती आधारे चारित्र्य ,परोपकार, नीतिमत्ता यांची कास न सोडता सरळ मार्गाने, कुणालाही न ठेच पोहोचवता समाजासाठी भरघोस हिमालया एवढं कार्य करू शकतो .याचा दाखला म्हणजे ए- टू -डी, नवहे तर ए -टू -झेड आपल्या आवाक्यात आणू शकतो. हे या कवींन सिद्ध केलं आहे .मात्र दुर्दैवाची बाब म्हणजे या कवी कडे म्हणावं असं कुणाचंच विशेषतः समाज धुरीणांचे लक्ष गेलेलं नाही. आणि हा कवीही मी मी म्हणत फिरत नाही. नव्हे स्वतःबद्दल ब्र ही काढत नाही. तो त्यांचा स्वभावही नाही. त्यांना त्याची गरजही वाटत नाही. त्यामुळे तुमचं आमचं म्हणजे सोलापूरच नुकसान होतंय .हे कोणाच्याही गावी नाही .कारण "पद्मश्री "किंवा त्या दर्जाच्या पुरस्काराचा धनी आपल्या गावात आहे .हेच कोणाच्या लक्षात आलेलं नाही .हाच कवी जर पुण्या मुंबईकडे असता तर डोक्यावर घेऊन नाचले असते लोक. असं मत प्रदर्शित करण्याचं कारण हा कवी फक्त अन्न, वस्त्र ,निवारा वर फक्त कविता नव्हे तर प्रत्यक्षात त्यासाठी आयुष्यभर झिजून हजारोंच्या मुखात त्याने भाकरी दिली आहे .देतो आहे. हे विशेष .यापेक्षा सविस्तर दोन वर्षांपूर्वी मी त्यांच्या मुलाखती मधून टीव्ही रसिकांसमोर हे सारे मांडलं होतं. ती मुलाखत जनता जनार्दनांना भावलीही होती .अंदाजे दहा-बारा वर्षांपूर्वी माझ्या संयोजना खालील काव्य संमेलनातून त्यांनी अनेक वेळा काव्यवाचनही करून रसिकमन जिंकलेले आहे .कसलाही इगो" न दाखवता हा तेजपुंज, सकारात्मकतेने ,कनवाळूपणे वावरणारा हा कवी काव्यसंग्रहाच्या माध्यमातून यावा ही माझी जुनी आकांक्षा आहे ."भिक्षांदेही "म्हणत ज्या पित्याने आपले कष्ट ,संस्कार या कवीला उभारण्यात लावले. परिस्थितीच्या थापडा खात हा कवी आज" भिक्षा दाता "झालेला आहे .हे सारे कुठेतरी मोकळेपणानं नोंद व्हावी ही माझी तळमळ .कारण या कवीने पुत्रवत प्रेम केलं आहे माझेवर. निर्व्यवहारिक शुद्ध अशा या आमच्या "समर्थ "नात्याला कुणा दुष्टाची दृष्ट लावण्याच धारिष्टही होणार नाही. एकमेकांच्या कविता मग त्या समोरा समोर,मोबाईलवर का असेना ऐकणे ऐकवणं हा आमचा छंद .अनेकदा घरी दोघांची मैफिल तासन तास सजली. त्या कवितांवर आता रसिकांचा हक्क आहे .तो सोहळा लवकर घडून यावा ही अपेक्षा आहे. कसलेही स्तोम न माजविता कसलाही सोस न धरता निश्चयतेने आयुष्याच्या एका कुतारथ क्षणी मानसरोवरा सारख्या तीर्थक्षेत्री जाऊन आत्मानंदाने भावोतकटतेने प्रकट होत हा कवी म्हणतो कसा "आता मृत्यूही आला तर आनंदाने समर्पित होईन" इतकी पराकोटीची भावुकता मनी नांदती ठेवत ,वयाच्या अमृतमहोत्सवी वरषात पोहोचलेला हा कवी नवोनमेषाने समाजदेवतेला "अलकनंदा"च्या पावन ,पवित्र जलाचे अर्घ्य समर्पित करतो आहे .हे अर्ध्य अर्पण करताना अनेकदा एखादा दुसरा विकारी कीटक दंश करेल तर त्यालाही ओजळीतून धरतीतलावर आणून जीवनदान देणारा. हा योगी समाजोपयोगी ठरला आहे .कारण त्यांनीच म्हणाल्याप्रमाणे
"मुखावरी हास्य मधुर असावे अक्षय,// अंतकरणी असावे प्रेम गहिरे अक्षय, //
या अशा "काव्य योगी "व्यक्तिमत्त्वाला म्हणजे आपण ओळखलंत त्या आदरणीय ऋषितुल्य प्रा. अरुण दिगंबर जोशी ऊर्फ ज्येष्ठ कवी ए.डी .जोशी ,(सर )यांना मनोभावे कुरनिसात करताना मन अतिशय हळवं होतं आहे. "कवी तो असा आहे आणणी". //.इती: श्री काव्य अरुणोदय जीवनी सत्यकथा सफल संपूर्ण // शतकोत्तरे वाटचाल असतु: श्रीरस्तू//
कवी- देवेंद्र औटी