खुशखबर ! सोलापूरात सुरु होणार बोटिंग.. कुठे ? वाचा

महानगरपालिकेने मागविल्या निविदा

खुशखबर ! सोलापूरात सुरु होणार बोटिंग.. कुठे ? वाचा

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूरकरांसाठी खुशखबर आहे. विजयपूर रस्त्यावरील धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज तलावात पुन्हा बोटींग सुरु करण्याचे नियोजन सोलापूर महानगरपालिकेकडून करण्यात येत आहे. त्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत.

सोलापूर महानगरपालिकेच्या भूमी व मालमत्ता विभागाने धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज तलाव या ठिकाणी बोटिंग करणेबाबत ई-निविदा मागवलेली आहे. सदरची ई-निविदा महाराष्ट्र शासनाच्या www.mahatenders.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर पाहण्यास उपलब्ध आहे. निविदा भरण्यासाठीचा कालावधी १३ नोव्हेंबर ते १ डिसेंबर इतका आहे. प्री-बीड बैठक दिनांक २२ नोव्हेंबर २०२१ रोजी दुपारी १२ वाजता मनपा आयुक्त कार्यालय येथे आयोजित करण्यात आलेली आहे.

महापालिकेच्यावतीने तलावामध्ये यांत्रिक बोटी, पेडल बोटी आणि जेट स्की या प्रकारच्या बोटिंगच्या सुविधा देण्यात येणार आहेत. या बोटिंगसाठी महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने प्रकाशित केलेल्या महाराष्ट्र जलक्रीडा धोरण २०१५ शी सुसंगत अशा सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना करण्यात येणार आहेत. सदरच्या ठिकाणी बोटिंग साठी आवश्यक असणारे जीव रक्षक  प्रणाली, प्रथमोपचार मेडिकल किट ठेवणे मक्तेदारावर बंधनकारक आहे. अधिकच्या माहितीसाठी सोलापूर महानगरपालिकेच्या भूमी व मालमत्ता या विभागाशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सोलापूरात बोटिंग सुरु झाल्यास सोलापूरकरांसाठी ती पर्वणी ठरणार आहे. यापूर्वी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज तलावात बोटिंगची सुविधा उपलब्ध होती. मात्र ती बंद पडल्याने सोलापूरकरांचा हिरमोड झाला होता. आता सोलापूर महानगरपालिकेने बोटींगसाठी पुन्हा निविदा मागविल्याने नागरिकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.