सोलापूर विद्यापीठ अधिसभेत गोंधळ

डॉ. विश्वनाथ कराड यांना डिलीट देण्याचा प्रस्ताव फेटाळला !

सोलापूर विद्यापीठ अधिसभेत गोंधळ

सोलापूर : प्रतिनिधी

डॉ. विश्वनाथ कराड यांना डि लीट पदवी देण्याचा प्रस्ताव सोलापूर विद्यापीठाच्या अधिसभेत दोन तृतीयांश बहुमत न मिळाल्याने फेटाळला गेला. मंगळवारी सोलापूर विद्यापीठाच्या सभागृहात झालेल्या सोलापूर विद्यापीठाच्या अधिसभेत या प्रस्तावावरून मोठा गोंधळ झाला.

एमआयटी शैक्षणिक संस्थेचे प्रमुख डॉ. विश्वनाथ कराड यांना डि लीट पदवी प्रदान करण्याचा प्रस्ताव कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी राज्यपालांकडे पाठवला होता. राज्यपालांनी हा प्रस्ताव व्यवस्थापन परिषद आणि अधिसभेकडे चर्चेसाठी आणि मंजुरीसाठी पाठवला होता. एक डिसेंबर रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर झाला. यानंतर २ डिसेंबर रोजी सिनेटची ऑनलाईन बैठक घेण्यात आली. या बैठकीत सदस्यांनी या प्रस्तावाच्या अंमलबजावणीसाठी घाई करू नये, असे मत मांडल्याने ही बैठक स्थगित करून बैठक मंगळवारी घेण्यात आली. 

मंगळवारी या विषयावर चर्चा सुरू झाल्यानंतर शाब्दिक चकमकी उडाल्या. बऱ्याच वेळाच्या चर्चेनंतरही एकमत होत नसल्याने सदस्यांनी मतदानाची मागणी केली. हात उंचावून झालेल्या मतदानात प्रस्तावाच्या बाजूने २७ तर प्रस्तावाच्या विरोधात २१ मते पडली. यानंतर गुप्त मतदानाची मागणी करण्यात आली. या मतदानात २६ मते प्रस्तावाच्या बाजूने तर २२ मते प्रस्तावाच्या विरोधात पडली. यावेळीही दोन तृतीयांश बहुमत पूर्ण न झाल्याने प्रस्ताव फेटाळला गेला. 

डॉ. विश्वनाथ कराड यांना डि लीट पदवी देण्याबद्दल हरकत नाही, परंतु प्रशासन इतकी घाई का करत आहे ?अशी चर्चा अधिसभा सदस्यांमध्ये आणि विद्यापीठ परिसरामध्ये होती.
---------------
अन् आंदोलक घुसले अधिसभेत
दरम्यान, लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची प्रतिमा घेऊन काही आंदोलक सोलापूर विद्यापीठाच्या अधिसभेत घुसले. लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना डि लीट देण्याचा प्रस्ताव यापूर्वीच पाठवला आहे. त्यावर चर्चा अंमलबजावणी न होता डि लीट पदवी देण्याचा प्रस्ताव आल्याने आंदोलक संतप्त झाले होते.