मागणी मान्य न झाल्याने विद्यार्थी थेट न्यायालयात

विद्यापीठ आणि महाविद्यालयाविरोधात दाखल केला दावा

मागणी मान्य न झाल्याने विद्यार्थी थेट न्यायालयात

सोलापूर ः प्रतिनिधी
पदव्युत्तर विधी अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रीयेतून होणारा अन्याय दूर करावा आणि सर्व विद्यार्थ्यांना समान न्याय द्यावा अशी मागणी करूनही विद्यापीठ आणि महाविद्यालयाने या मागणीची दखल घेतली नाही असा आरोप करत विधी अभ्यासक्रमाच्या दोन विद्यार्थ्यांनी थेट न्यायालयात धाव घेतली आहे. पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी विद्यापीठ आणि दयानंद विधी महाविद्यालय या दोघांना प्रतिवादी करीत ॲड. मृणाल कांबळे आणि ॲड. अक्षय जानकर या विद्यार्थ्यांनी न्यायालयात दावा दाखल केला आहे.
 
ॲड. मृणाल कांबळे म्हणाले, आम्ही 2019 साली कायद्याची पदवी घेतली. कोरोनामुळे मार्च 2020 आणि मार्च 2021 या दोन्ही वर्षी एल. एल. बी. च्या परीक्षा ऑनलाईन घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी घरात बसून परीक्षा दिल्याने अनेक विद्यार्थ्यांनी कॉपी करून किंवा अन्य मार्गांचा वापर करून बेकायदेशीरपणे उत्तरे दिली. परिणामी या दोन्हीवर्षीच्या परीक्षेत या विद्यार्थ्यांना सरासरी 70 ते 90 टक्के गुण मिळाले आहेत. मात्र मार्च 2020 पूर्वी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणांची टक्केवारी मात्र सर्वाधिक 65 टक्के इतकी होती.
 
कायद्याचे शिक्षण व्यावसायिक शिक्षणात मोडत असल्याने या परीक्षांना आजवर 75 ते 90 टक्के गुण मिळालेले नाहीत. परंतु 2020 आणि 2021 मध्ये परीक्षा दिलेल्या अनेक विद्यार्थ्यांना तितके गुण मिळाले आहेत. ते गैरमार्गाचा वापर केल्याने पडले आहेत. तसेच काही सातत्याने अनुत्तीर्ण होणारे विद्यार्थीही ऑनलाईन परिक्षेमुळे उत्तीर्ण झाले आहेत. अशा विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीच्या परीक्षेच्या गुणांच्या आधारावर पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश दिल्यास अभ्यासक्रमाचा दर्जा घसरणार आहे. याउलट 2020 पूर्वी नियमित पद्धतीने परीक्षा देऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पात्रता असूनही पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश मिळणार नाही. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना समान न्याय मिळण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांची सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) होणे आवश्‍यक आहे असेही ॲड. मृणाल कांबळे म्हणाले.
 
याबाबत ॲड. कांबळे यांनी राज्यपाल, मुख्यमंत्री तसेच उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री यांना पत्र पाठवून प्रवेश परीक्षा घ्या किंवा नियमित परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी जागा आरक्षित ठेवण्याची मागणी केली होती. मात्र या मागणीकडे दुर्लक्ष करून सोलापूर विद्यापीठ आणि दयानंद विधी महाविद्यालयाने प्रवेश न घेता एल.एल.बी. च्या गुणांवरच परीक्षा घेण्याचे ठरविले. त्यामुळे हा दावा दाखल केल्याचे ते म्हणाले.
 
पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी विद्यापीठ आणि दयानंद विधी महाविद्यालयाने सुरू केलेली प्रवेश प्रक्रीया चुकीची ठरवावी, प्रवेश परीक्षा घ्यावी किंवा मार्च 2020 पूर्वी कायद्याची परीक्षा उत्त्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी 50 टक्के जागा आरक्षित ठेवून त्यांची गुणवत्ता यादी वेगळी करावी, अशा मागण्या या दाव्यातून करण्यात आल्या आहेत.