किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात महाविद्यालयांनी व्हावे सहभागी

कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांचे आवाहन

किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात महाविद्यालयांनी व्हावे सहभागी

सोलापूर : प्रतिनिधी

किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाशी संलग्न सर्व महाविद्यालयांनी सक्रियपणे सहभागी व्हावे, असे आवाहन विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी केले. महोत्सव बाबत विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीवेळी त्या बोलत होत्या.

राष्ट्रीय सेवा योजना तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची संलग्न असलेल्या सर्व महाविद्यालयातील विद्यार्थी प्राध्यापक यांनी किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभाग घेऊन पर्यावरण विषयक या जागृती मोहिमेत आपला सहभाग नोंदवणे आवश्यक आहे. पर्यावरणाच्या सुदृढ करणात या महोत्सवाचे योगदान मोठे आहे. पर्यावरण विषयात भविष्याचा वेध घेत सकस अन्न समृद्ध निसर्ग आणि आरोग्यपूर्ण समाज या विषयांमध्ये किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून जनजागृती करण्यात येत आहे. विविध विषयांवर गेल्या १५ वर्षांपासून होत असलेल्या त्या महोत्सवात यंदाही सर्व विद्यार्थी प्राध्यापक तसेच नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहनही यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ मृणालिनी फडणवीस यांनी केले.

किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासात सहभागी होण्यासाठी सोलापूरकरांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत या महोत्सवासाठी ऑनलाइन पद्धतीने दोन हजार ५०० जणांनी नोंदणी केली आहे, अशी माहिती किर्लोस्कर कंपनीचे एच.आर. मॅनेजर ऋषिकेश कुलकर्णी यांनी यावेळी दिली. याप्रसंगी विद्यापीठाच्या वृत्तपत्रकारिता आणि जनसंज्ञापन विभागाचे प्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर, किर्लोस्कर कंपनीचे फॅक्टरी मॅनेजर विलास खरात, एच.आर. मॅनेजर ऋषिकेश कुलकर्णी, आदी उपस्थित होते.