आर्यन्स युनिक प्रीस्कूलतर्फे गंमत जंमत बालजत्रा व प्रदर्शन

सहभागी होण्याचे चिमुकल्यांना आवाहन

आर्यन्स युनिक प्रीस्कूलतर्फे गंमत जंमत बालजत्रा व प्रदर्शन

सोलापूर : प्रतिनिधी

आर्यन्स युनिक प्रि स्कूलतर्फे शनिवारी (ता.४) व रविवारी (ता. ५) शांतीसागर मंगल कार्यालय येथे गंमत जंमत बालजत्रा व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आर्यन्स युनिक प्रि स्कूलच्या संस्थापिका व संचालिका गौरी जोग यांनी पत्रकार परिषदेत दिली. या बालजत्रेस व प्रदर्शनास प्रवेश मोफत असून २ ते १० वयोगटातील मुलामुलींनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. या प्रदर्शनात कोणत्याही प्रकारची विक्री केली जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

शनिवारी (ता.४) दुपारी ४ ते रात्री ८ पर्यंत तसेच रविवारी (ता. ५) सकाळी १० ते दुपारी १, दुपारी ४ ते रात्री ८ वाजेपर्यंत हि बालजत्रा व प्रदर्शन चालणार आहे. यात विलास करंदीकर (पुणे) यांच्या संग्रहातील भातुकलीच्या खेळामधील तब्बल ३ हजार खेळणी प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहेत. यात  खेळण्यातील तांब्या-पितळेची भांडी, बंब, चांदीचा पाट, किटली अशा वस्तूंचा समावेश आहे. विशेष म्हणजे या भातुकलीच्या खेळात लाईव्ह स्वयंपाक घर असून लहान मुलांना या ठिकाणी स्वयंपाकही बनवता येणार आहे.

त्याचबरोबर रत्नाकर जोशी (पुणे) यांच्या खेळण्यातील हजारो गाड्यांचा संग्रहदेखील या प्रदर्शनात मुलांना पाहण्यासाठी ठेवण्यात येणार आहे. तसेच बौद्धिक विकासासाठी कोडी, खेळणी, मिकी माऊस, जंपर, मेहंदी, टॅटू, जादूचे प्रयोगही इथे असणार आहेत. सोलापुरात प्रथमच अशा प्रकारच्या बालजत्रा व प्रदर्शनाचे आयोजन मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे.

सोलापूर शहर आणि परिसरातील लहान मुलांनी, मुलींनी आणि पालकांनी या गंमत जंमत बालजत्रा आणि प्रदर्शनास भेट द्यावी, असे आवाहन आर्यन्स युनिक प्रि स्कूलच्या संस्थापिका व संचालिका गौरी जोग यांनी केले आहे.

या पत्रकार परिषदेस उषा मुलगे, सारिका कोकीळ, स्वाती देशपांडे, स्नेहल जोशी उपस्थित होते.