आई प्रतिष्ठानने केली कन्यांची दिवाळी गोड
गरजू विद्यार्थिनींना कपडे, फराळ आणि दिवाळी साहित्य वाटप
सोलापूर : प्रतिनिधी
समाजात आपल्याच सोबत राहणाऱ्या परंतु काही कारणांमुळे दिवाळीचा सण साजरा न करू शकणाऱ्या गरजू विद्यार्थिनींची दिवाळी आई प्रतिष्ठानने गोड केली. भू. म. पुल्ली कन्या प्रशालेतील ९७ गरजू विद्यार्थिनींना सोमवारी कपडे, फराळ आणि दिवाळी साहित्य वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे हे पाचवे वर्ष होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक डॉ. किरण देशमुख उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मशाली शिक्षण संस्थेचे विश्वस्त पांडुरंग दिड्डी होते. तर यावेळी व्यासपीठावर संयोजक आणि आई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मोहन डांगरे, सचिव सचिन हिरेमठ, उद्योजक संतोष हविनाळे, पद्मशाली शिक्षण संस्थेचे विश्वस्त रमेश केदारी, सोलापूर जनता सहकारी बँकेचे शाखाधिकारी सदाशिव उडता, प्रशालेच्या प्राचार्या गीता सादूल, उपमुख्याध्यापक युवराज मेटे, पर्यवेक्षिका प्रणिता सामल, लक्ष्मी कोंडा, वसंत जाधव, राहुल डांगरे, सुधाकर नराल, प्रताप महावरकर उपस्थित होते.
प्रारंभी व्याहती होम करुन मंत्रोच्चारात कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यानंतर सरस्वती पूजन आणि गुणवंत विद्यार्थीनींचा सत्कार करण्यात आला. यानंतर मान्यवरांच्या हस्ते कपडे, फराळ आणि दिवाळी साहित्य वाटप करण्यात आले.
याप्रसंगी डॉ. किरण देशमुख म्हणाले, आई प्रतिष्ठानतर्फे गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने हा उपक्रम राबविला जात आहे. संकटांच्या अंधारात मदतीचा दिवा लावण्याचे काम आई प्रतिष्ठानने केल्याचे डॉ. देशमुख म्हणाले. पद्मशाली शिक्षण संस्थेचे विश्वस्त पांडुरंग दिड्डी म्हणाले, आई प्रतिष्ठानचे कार्य अत्यंत चांगले आहे. नियमितपणे विधायक उपक्रम राबवून समाजातील गरजूंच्या समस्या सोडविण्याचे कौतुकास्पद कार्य आई प्रतिष्ठानने केले असल्याचेही श्री. दिड्डी म्हणाले.
संयोजक आणि आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन डांगरे म्हणाले, आपण या समाजाचे देणे लागतो ही भावना महत्वाची आणि आवश्यक आहे. मुलांच्या जडण घडणीत आईची भूमिका अनमोल असते. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांचे प्रेरणस्थानही महिलाच होत्या. विद्यार्थीनींनी चांगले शिकावे यासाठी आई प्रतिष्ठान प्रयत्न करत असल्याचे श्री. डांगरे म्हणाले.
प्रशालेच्या प्राचार्या गीता सादूल यांनी प्रास्ताविक केले. शिक्षिका उमा कोटा यांनी सूत्रसंचालन तर प्रणिता सामल यांनी आभाप्रदर्शन केले. या कार्यक्रमास योगेश डांगरे, दादाराव चव्हाण, शुभम चिट्याल, विवेक नक्का, अविनाश शंकू, लक्ष्मीकांत येलदी, व्यंकटेश बंडा आदी उपस्थित होते.