सरोद, बासरी अन् शास्त्रीय गायनाची मेजवानी
प्रिसिजन संगीत महोत्सव १० आणि ११ फेब्रुवारी रोजी
सोलापूर : प्रतिनिधी
जागतिक ख्यातीच्या कलावंतांचे सरोद वादन, बासरी वादन आणि शास्त्रीय गायन ऐकण्याची मेजवानी सोलापूरकरांना मिळणार आहे. प्रिसिजन फाउंडेशन आयोजित प्रिसिजन संगीत महोत्सव १० आणि ११ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.२५ वाजता हुतात्मा स्मृती मंदिरात होणार असल्याची माहिती फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
सोलापूरकर रसिकांना उत्सुकता लागून राहिलेल्या प्रिसिजन संगीत महोत्सवाची घोषणा शनिवारी प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा यांनी केली. यावेळी प्रिसिजन कॅमशाफ्ट लिमिटेडचे चेअरमन यतिन शहा यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रिसिजन संगीत महोत्सवाचे उद्घाटन १० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.२५ वाजता होणार असून महोत्सवाच्या पहिल्या दिवशी शनिवारी (दि.१०) पहिल्या सत्रात अनुपम जोशी यांच्या सरोद वादनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यांना तबल्यावर शंतनू देशमुख साथ करतील तर दुसऱ्या सत्रात किराणा घराण्याचे जेष्ठ गायक पं. हरीश तिवारी यांचे शास्त्रीय गायन होणार आहे. त्यांना संवादिनीवर सुयोग कुंडलकर तर तबल्यावर रोहित मुजुमदार साथसंगत करणार आहेत.
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी रविवारी (दि. ११) पहिल्या सत्रात युवा कलाकार तेजस विंचुरकर यांचे बासरी वादन होणार आहे. त्यांना त्यांच्या पत्नी मिताली विंचूरकर तबल्याची साथ करणार आहेत. प्रिसिजन संगीत महोत्सवाचे अंतिम सत्र किराणा घराण्याचे गायक पं. कैवल्यकुमार गुरव यांच्या शास्त्रीय गायनाने सजणार आहे. त्यांना तबल्यावर प्रशांत पांडव तर संवादिनीवर स्वरूप दिवाण साथसंगत करतील.
आपल्या देशाला हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची प्रदीर्घ परंपरा आहे. शास्त्रीय संगीत आणि कलांचा प्रचार प्रसार व्हावा आणि श्रोत्यांची शास्त्रीय संगीतातील गोडी वाढावी, या उद्देशाने प्रिसिजन संगीत महोत्सव गेल्या आठ वर्षांपासून प्रयत्नशील आहे, असे डॉ. शहा यांनी सांगितले.
प्रिसिजन संगीत महोत्सवासाठी सर्व रसिकांना निशुल्क प्रवेश असून या कार्यक्रमासाठीच्या प्रवेशिका मंगळवार (दि. ६ फेब्रुवारीपासून) हुतात्मा स्मृती मंदिरात सकाळी ९ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत उपलब्ध असणार आहेत. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर बसण्याची सोय करण्यात आली आहे.
रसिकांनी आपले नाव नोंदवून प्रवेशिका घ्याव्यात आणि अधिक माहितीसाठी गुरु वठारे यांच्याशी ९४२२०६६२१३ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. या पत्रकार परिषदेस प्रिसीजन कॅमशाफ्टचे जनसंपर्क अधिकारी माधव देशपांडे, संदीप पिसके उपस्थित होते.