सोलापूरात शिवसेना - राणे वाद पेटला
शौचालयांवर लागले राणेंचे पोस्टर, चपलांचा हार
सोलापूर : प्रतिनिधी
मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख
उद्धव ठाकरे यांच्याविषयी अपमानजनक शब्द वापरल्याप्रकरणी राज्यात शिवसेना विरूद्ध राणे समर्थक असा वाद पेटला आहे. त्याचे पडसाद सोलापूरातही उमटले आहेत. शहर शिवसेनेने सकाळी नवी पेठेत नारायण राणेंच्या प्रतिमेला चपलांचा हार घालून निषेध व्यक्त केला. तर जिल्हा शिवसेनेने जिल्हाभरातील सार्वजनिक शौचालयांवर नारायण राणे यांचे पोस्टर लावण्याचे आंदोलन सुरू केले आहे.
जनआर्शिवाद यात्रेदरम्यान मंगळवारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल एकेरी शब्द वापरले. तसेच त्यांच्या कानशिलात लगावण्याची भाषा केल्याने शिवसैनिकांत रोष निर्माण झाला आहे. राज्यभर नारायण राणे यांच्या विरोधात आंदोलन सुरू झाल्याने राणे विरूद्ध शिवसेना असा वाद बराच पुढे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सोलापूरात सकाळी उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, विद्यार्थी सेनेचे विभागीय संघटक महेश धाराशिवकर, विजय पुकाळे, उपशहरप्रमुख बाळासाहेब गायकवाड, नाना कळसकर आदी शिवसैनिकांनी एकत्र येवून नवी पेठेत नारायण राणे यांच्या प्रतिमेला चपलांचा हार घालून घोषणाबाजी केली. हे आंदोलन संपते न संपते तोच जिल्हाप्रमुख पुरूषोत्तम बरडे यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक शौचालयांवर नारायण राणे यांचे पोस्टर लावण्यात आले. राणे पिता - पुत्रांनी अपमानजनक आणि प्रक्षोभक वक्तव्ये रोखली नाहीत तर नारायण राणे आणि त्यांच्या दोन्ही मुलांना शिवसेना स्टाईलने अद्दल घडविण्यात येईल असा इशारा जिल्हाप्रमुख पुरूषोत्तम बरडे यांनी यावेळी दिला.
तिकडे चार हुतात्मा पुतळा चौकात जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी पुन्हा आंदोलनास सुरुवात केली. राणे यांच्या प्रतिमेस जोडे मारत निषेध व्यक्त केला.
राणे यांच्या विरोधात शिवसेना रस्त्यावर उतरल्यामुळे आता हा वाद कोणत्या वळणावर जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.