स्त्रीशक्ती वंदन विधेयकामुळे विकासाकडे जाण्याचा राजमार्ग झाला खुला
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
सोलापूर : प्रतिनिधी
स्त्रीशक्ती वंदन विधेयकामुळे महिलांचा विकासाकडे जाण्याचा राजमार्ग खुला झाला आहे, असे प्रतिपादन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले. डॉ. गोऱ्हे शुक्रवारी सोलापूर धाराशिवच्या दौऱ्यावर होत्या. या दौऱ्यात त्यांनी सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला.
डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, महिला स्त्रीशक्ती वंदन विधेयकाच्या रूपाने एनडीए सरकारने सकारात्मक पाऊल उचलले आहे. देशभरातील मतदारसंघांची पुनर्रचना, आरक्षण अशा गोष्टींची पुरता झाल्यानंतर त्या विधेयकाची अंमलबजावणी देशभरात होणार आहे. १२ सप्टेंबर १९९६ साली हे विधेयक लोकसभेत मांडूनही मंजूर न झाल्यामुळे महिला स्त्रीशक्ती वंदन विधेयकाला आधीच २७ वर्षे उशीर झाला आहे. मात्र आता या विधेयकाची अंमलबजावणी होईल. काहीजण या विधेयकाला इव्हेंट मॅनेजमेंट म्हणत आहेत. मात्र महिलांच्या राजकीय सहभागाला इव्हेंट मॅनेजमेंट म्हणणे चुकीचे असल्याचेही डॉ. गोऱ्हे यावेळी म्हणाल्या.
राज्य सरकारचेही नवे महिला धोरण येत आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद सुरू आहे. यावर लवकरच सकारात्मक विचार होईल असेही डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
पंढरपूरच्या विकास आराखड्याच्या रखडलेल्या अंमलबजावणी बाबतच्या प्रश्नावर डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, २१ जुलै रोजी याबाबत बैठक घेण्यात आली होती. त्यानंतरची शिखर परिषदेची बैठक अद्याप व्हायची आहे. मात्र मंदिरासाठी ७३ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्याबाबतचे टेंडरही निघाले आहे. उर्वरित प्रक्रिया व कामेही लवकरच होतील असेही त्यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेस शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख रविना राठोड, शहर प्रमुख जयश्री पवार, मंगला कोल्हे, माधुरी कांबळे, पूजा चव्हाण, अश्विनी भोसले, सुनंदा साळुंखे आदी उपस्थित होत्या.