आंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धेत सोलापूरची तेजस्विनी मादगुंडी तृतीय

देशविदेशातील स्पर्धकांचा सहभाग

आंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धेत सोलापूरची तेजस्विनी मादगुंडी तृतीय

सोलापूर : प्रतिनिधी

आंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धेत सोलापूरच्या इंडियन मॉडेल स्कुलची विद्यार्थिनी तेजस्विनी किरण मादगुंडी हिने तृतीय क्रमांक पटकावला. जागतिक योग दिनाच्या निमित्ताने ही स्पर्धा आयोजित केली होती.

वाय. के. ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट संलग्नित योगा लाइफ सेंटर, जिल्हा क्रीडा कार्यालय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, दीक्षाभूमी, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त डॉ. सुधीर लेकुरवाळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ही ऑनलाईन आंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा योगासन आणि इनोव्हेटिव्ह योगासन या दोन प्रकारात विभागली गेली होती. या स्पर्धेकरिता भारत, सिंगापूर, व्हियेतनाम, कजाकिस्तान, अमेरिका अशा अनेक देश-विदेशातील स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेचा निकाल आंतरराष्ट्रीय योगपटू धनश्री लेकुरवाळे यांनी जाहीर केला.

यातील ५ ते १० वयोगटातील मुलींच्या गटात तेजस्विनीला तृतीय क्रमांक मिळाला. नागपूरच्या आर्या मेंढेकरने प्रथम तर नागपूरच्याच नतिका ढोले द्वितीय हिने व्दितीय क्रमांक मिळवला.

या स्पर्धेचा बक्षीस समारंभ ऑनलाईन सोमवारी पद्धतीने झाला. या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे क्रीडा मंत्री सुनील केदार यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री आदिती तटकरे तसेच सामाजिक व न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी शुभेच्छा दिल्या.

तेजस्विनी मादगुंडी हिला सोलापूरच्या योगगुरू स्नेहल पेंडसे आणि रोहन घाडगे यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या यशाबद्दल अभिनंदन होत आहे.