'आरोग्याची वारी पंढरीच्या दारी' ची जागतिक स्तरावर झाली नोंद

प्रा. शिवाजीराव सावंत : जागतिक रेकॉर्ड बुकात घेतली दखल

'आरोग्याची वारी पंढरीच्या दारी' ची जागतिक स्तरावर झाली नोंद

सोलापूर : प्रतिनिधी

आषाढीवारीच्या निमित्ताने पंढरपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या 'आरोग्याची वारी पंढरीच्या दारी' या महाआरोग्य शिबिरातची नोंद इंटरनॅशनल वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स मध्ये जागतिक स्तरावर घेण्यात आल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हासंपर्कप्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

या शिबिराची जगातील सर्वात मोठे आरोग्य शिबिर म्हणून नोंद झाली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजीराव सावंत आणि शिवसेनेचे जिल्हासंपर्कप्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत यांच्या पुढाकाराने झालेल्या या शिबिराची नोंद जागतिक पातळीवर घेतली गेल्याने सोलापूर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

या आरोग्य शिबिरात तब्बल ११ लाख ६४ हजार ६८४ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली होती. याकरिता ५ हजार ७०० डॉक्टरांनी वैद्यकिय सेवा बजावली होती. यावेळी २ लाख जणांना चष्मे वाटप करण्यात आले होते. तर तब्बल १० हजार कार्यकर्त्यांनी वारकऱ्यांच्या सेवेसाठी अखंड ८ दिवस परिश्रम घेतले होते. या आरोग्य शिबिरात तपासणी केल्यानंतर ज्यांना गंभीर आजारांवर पुढील उपचारांची आवश्यकता होती अशा रुग्णांना मोफत उपचाराची सोयही राज्य शासनाकडून करण्यात आली होती. या कार्याची दखल घेऊन शिबिराची जागतिक स्तरावर नोंद करण्यात आली आहे. याबाबतची माहिती नॅशनल बुक रेकॉर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज वेभ यांनी जाहीर केली आहे असे शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेस शिवसेनेचे जिल्हासंपर्कप्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत, शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे, जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, शहर समन्वयक दिलीप कोल्हे, युवासेना जिल्हाप्रमुख प्रियदर्शन साठे आदी उपस्थित होते.
-----------
श्री विठ्ठलाने करून घेतली सेवा
आषाढीवारीसाठी पंढरपूरला येणारे वारकरी हे श्री विठ्ठलाचेच अंश आहेत. त्यामुळे त्यांची सेवा करण्यासाठी या शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराचा लाभ ११ लाख जणांना झाला याचे समाधान आहे. श्री विठ्ठलानेच आमच्याकडून ही सेवा करून घेतली अशी आमची भावना आहे.
--- प्रा. शिवाजीराव सावंत, जिल्हा संपर्कप्रमुख, शिवसेना