उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापुरात
भाजपमधील अंतर्गत वादावर काय काढणार तोडगा ? : चर्चेला ऊत
सोलापूर : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापुरात येत आहेत. यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत वादावर काय चर्चा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
माढा तालुक्यातील अरण येथील कार्यक्रमाला जाण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूर शहरात येत आहेत. पुढील दोन महिन्यात महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर शहर उत्तर मतदार संघातून भाजपाचा उमेदवार कोण असावा याबाबत चर्चा सुरू झाली आहे. गेल्या वीस वर्षांपासून आमदार राहिलेले माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या मोर्चे बांधणी करीत आहेत. शहर उत्तर मध्ये यंदा भाकरी फिरवायचीच असा चंग बांधलेल्या अनेक भाजप, पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून सोशल मीडियावरुन आपल्या आगामी भूमिकेची मांडणी जोरदार सुरू आहे.
आमदार विजयकुमार देशमुख यांना उद्देशून, 'भाकरी पलटली नाही तर ती करपते', 'प्रत्येक वस्तू आयुष्यभर तुमचीच नसणार आहे याची सवय करून घ्या', ' सत्तेचा अमर पट्टा कुणीच बांधून येत नसतं... या जगात परमनंट असा आहेच काय ?', 'बदल हा सृष्टीचा अंतिम आदेश असतो', 'यंदा विकेट फिक्स' अशा पोस्ट टाकल्या जात आहेत. यातून आगामी विधानसभा निवडणुकीत आमदार विजयकुमार देशमुख यांना पक्षांतर्गत होणारा विरोध मोठ्या प्रमाणावर असणार आहे याची प्रचिती येत आहे.
तर दुसरीकडे आमदार विजयकुमार देशमुख समर्थकांनी 'पर्मनंट आमदार', 'सुना है तुझमे बहुत दम है चल दिखा तेरे सामने हम है', 'आमचं ठरलंय शहर उत्तरला एकच उत्तर देशमुख मालक' अशा पोस्ट करुन प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे भाजपमध्ये पूर्वीपासून असलेला वाद आता सोशल मीडियाच्या माध्यमातून चव्हाट्यावर आला आहे.
या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूरात येत आहेत. विधानसभा निवडणुकीवरून शहर भाजपमध्ये उफाळलेल्या या अंतर्गत वादावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय तोडगा काढणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.