आज शाळा महाविद्यालयांना जिल्हाधिकाऱ्यांकडून सुट्टी जाहीर

मनोज जरांगे - पाटील काय बोलणार ? आज शांतता रॅली

आज शाळा महाविद्यालयांना जिल्हाधिकाऱ्यांकडून सुट्टी जाहीर

सोलापूर : प्रतिनिधी

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे - पाटील यांच्या आज सोलापुरात होणाऱ्या शांतता रॅलीमुळे सोलापूर शहरातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मंगळवारी रात्री उशिरा काढण्यात आला. याबाबत अप्पर जिल्हाधिकारी मनिषा कुंभार यांनी निवेदनाद्वारे माहिती दिली.

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा नेते मनोज जरांगे - पाटील यांचा पश्चिम महाराष्ट्र दौरा आज गुरुवारी सोलापुरातून सुरुवात होत आहे. त्यानिमित्त गुरुवारी सकाळी ११ वाजल्यापासून शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती संभाजी महाराज चौकातील धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या मूर्तीपासून पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मूर्तीपर्यंत ही रॅली होणार आहे. यानंतर छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकात मनोज जरांगे - पाटील यांचे एकमेव भाषण होणार आहे.

यावेळी मराठा समाजाच्या आंदोलकांची प्रचंड मोठी गर्दी या परिसरात होणार आहे. लाखो मराठा आंदोलक या शांतता रॅलीसाठी एकत्र करण्याचा निर्धार मराठा समाजाच्या समन्वयकांनी आणि मराठा क्रांती मोर्चाने केला आहे. त्यामुळे यावेळी होणारी संभाव्य वाहतूक कोंडी पाहता विद्यार्थ्यांना अनेक अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. खबरदारीचा उपाय म्हणून अप्पर जिल्हादंडाधिकारी मनीषा कुंभार यांनी गुरुवारी शाळांना आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. यात सर्व सरकारी, खासगी, अनुदानित व विनाअनुदानित शाळा, आश्रमशाळा, महाविद्यालय व व्यवसाय प्रशिक्षण केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली आहे. तथापि, या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून कामकाज करावे, असेही आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान, मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे - पाटील यांच्या शांतता रॅलीसाठी समाज बांधवांनी लाखोंच्या संख्येने जमावे, असे आवाहन समन्वयक आणि शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी केले आहे. राज्यभर प्रचंड मोठी चर्चा सुरू असलेल्या मराठा आरक्षणावर आंदोलनाचे नेते मनोज जरांगे - पाटील काय बोलणार याकडे संपूर्ण जिल्हावासियांचे लक्ष लागून राहिले आहे.