हा तर माझा गोरा पांडुरंग.....!'
'डॉक्टर्स डे' विशेष
आज 'डॉक्टर्स डे'....हजारो रुग्णांना मृत्यूच्या दारातून परत आणणाऱ्या डॉक्टरांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस...आज जाणून घेऊया सोलापूरातील प्रख्यात डॉक्टर विशाल गोरे यांच्या विषयी !
कोरोनाचा तो अत्यंत कठीण काळ..... डॉक्टरांनाही रुग्णालयात बेड मिळू नये इतका कठीण... ! सर्वत्र पसरलेल्या भयंकर भीतीच्या वातावरणात एक महिला रुग्णालयात कोरोवरील उपचारासाठी दाखल झाली. ५५ वर्षांच्या त्या महिलेला अनकंट्रोल्ड डायबेटीस, रक्तदाबाचा त्रास होता. तशातच रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने ती घाबरून गेलेली. हे कमी म्हणून की काय नवरा आणि मुलगा दोघेही कॉरंटाईन. सुरुवातीला कमी असलेला त्रास वाढू लागला आणि ती माऊली तापाने फणफणली. खूपच दम लागत असल्याने तिला त्वरित आयसीयूमध्ये दाखल केले. तिच्या मुलाचा डॉक्टरांना फोन आला, 'सर, काहीही करा, पण माझी आई वाचवा !'
ती महिला बायपॅप आणि व्हेंटिलेटरवर होती. तिची जीवन मिळण्याची सर्व आशा आता केवळ आणि केवळ डॉक्टरांवर होती. डॉक्टर राउंडसाठी गेले की ती माऊली डॉक्टरांचा हात हातात घेई आणि एकटक पाहत राही. त्यावेळी तिच्या डोळ्यांतून वाहणाऱ्या अश्रूधाराच तिच्या भावना डॉक्टरांपर्यंत पोहचवायच्या. 'शब्दावाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले...' असेच काहीसे वेगळ्या अर्थाने म्हणता येईल.
डॉक्टरांचे तिला वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू ठेवले होतेच. अखेर तो दिवस उजाडला. त्या महिलेला बायपॅप, व्हेंटिलेटर काढून नॉर्मल ऑक्सिजन सपोर्टवर आणण्यात डॉक्टरांचे पथक यशस्वी झाले. तिची कोरोना चाचणीही निगेटिव्ह आली. जणू २० दिवसांपासून सुरू असलेल्या डॉक्टर आणि मृत्यू यांच्या लढाईत डॉक्टरांनी विजय मिळवला होता.
'आई, आज तुम्हाला घरी सोडणार आहोत', असे सांगताच ती महिला रडू लागली. ती म्हणाली, 'डॉक्टर साहेब, माझी एक इच्छा पूर्ण कराल ?' डॉक्टर त्या माऊलीच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले, 'बोला !' ती महिला म्हणाली, 'तुमचा मास्क काढा, मला तुम्हाला बघायचंय.' डॉक्टरांनी मास्क काढताच तिने हात जोडले आणि म्हणाली, 'ह्यो तर माझा गोरा पांडुरंग....!' तिने डॉक्टरांचे हात पकडून आपल्या डोक्यावर ठेवले. यानंतर मात्र इतका वेळ बऱ्याच वेळापासून रोखून ठेवलेला अश्रूंचा बांध फुटला आणि आता ती माऊली आणि डॉक्टरांच्याही डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. या घटनेचे साक्षीदार बनलेला तेथील कर्मचारी वर्ग नकळत टाळ्या वाजवत होता. त्या माऊलीला मृत्यूच्या दाढेतून परत आणणारे डॉक्टर होते, प्रख्यात फिजिशियन डॉ. विशाल गोरे.
--------------------------------------
90 वर्षांच्या आजी झाल्या ठणठणीत
वाढती रुग्णसंख्या आणि वेगाने पसरणारा कोरोना...एकीकडे बेडची कमतरता तर ज्यांना बेड मिळाला त्यांना ऑक्सिजनची कमतरता....त्यामुळे रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक यांच्या प्रमाणेच डॉक्टरांचेही मानसिक खच्चीकरण होत होते. अशा काळात एक 90 वर्षांच्या आजींचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. वय अधिक असल्याने जरा जास्तच काळजी घेणे आवश्यक होते.
डॉ. विशाल गोरे यांनी या आजींवर उपचार करण्याची जबाबदारी घेतली. अपवाद वगळता रुग्णालयाची पायरी न चढलेल्या आजींना रुग्णालयात ठेवल्याने त्या घाबरल्या होत्या. कोविड संसर्गाच्या शक्यतेमुळे मुलगा किंवा इतर कोणीही भेटू शकत नव्हते. परिणामी त्यांच्या चिंतेत जास्तच भर पडली होती. ऑक्सिजन, सलाईन लावून घेण्यास त्या तयार नव्हत्या. त्यांचा दम वाढत चालला होता. कमी - जास्त होणारा रक्तदाब (बी.पी.) आणि वाढत्या वयामुळे ढासळत चाललेले मानसिक संतुलन यांमुळे डॉक्टर देखील चिंतेत होते. अशावेळी डॉ. विशाल गोरे यांनी या आजींना बरे करायचेच असा निश्चय करून उपचारास सुरूवात केली. पीपीई किट घातलेले डॉक्टर, नर्स, आया यांनी आजींशी संवाद साधत असताना त्यांचा मुलगा, सून, गावाकडची मंडळी आली आहेत असे सांगितले जाई. आजींची समजूत काढत त्यांच्यावर उपचार करून डॉ. विशाल गोरे यांनी ठणठणीत बरे केले. केवळ औषधोपचार न करता रुग्णाला आपलेसे करून घेऊन त्यांच्यावर यशस्वी उपचार करणारे डॉ. विशाल गोरे म्हणूनच काहीसे वेगळे आहेत.
-------------------------------
'तुझ्या हातून सर्व पेशंट बरे होऊ दे'
७६ वर्षांच्या आजी प्राईड हॉस्पिटलमध्ये भरती झाल्या. कोरोनाने त्यांना पुरते गाठले होते. आल्यानंतर त्रास सुरू झाल्याने त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले. ऑक्सिजन, बायपॅप, व्हेंटिलेटर, रेमडेसिव्हीर, टोसिलीझुमॅब अशी उपचारांची साखळी वाढत चालली होती. तब्बल २० - २५ दिवस डॉ. विशाल गोरे यांनी केलेल्या उपचारानंतर आजी बऱ्या व्यवस्थित झाल्या. त्यांना घरी जाताना अश्रू आवरले नाहीत. आजींनी डॉक्टरांना मिठी मारत अश्रूंना वाट मोकळी करून दिली. 'बेटा, तुझ्या हातून असेच सर्व पेशंट बरे होऊदे' असा आशीर्वाद देखील दिला. "हजारो रुग्ण आम्ही तपासतो, उपचार करतो. त्यांना बरेही करतो. मात्र असे थोरामोठ्यांचे आशीर्वाद आणि रुग्णांच्या डोळ्यांत दिसणारी कृतार्थता आम्हाला सातत्याने प्रेरणा देते." ही डॉ. विशाल गोरे यांची भावना त्यांचे 'अत्यंत सहृदयी डॉक्टर' असे वर्णन करण्यासाठी पुरेशी आहे.
---------------------------------
किंबहुना सर्व सुखी....
डॉक्टर म्हटले की काहीशी भीती, त्यात गंभीर आजार असल्यास जीवाची अनिश्चितता आणि यातून प्रचंड प्रमाणात येणारा मानसिक ताण.... हे जणू समीकरण बनले आहे. मात्र या तीनही गोष्टी जिथे बहुतांश प्रमाणात कमी होतात ते ठिकाण म्हणजे डॉ. विशाल गोरे सर.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदानात लिहलेल्या 'किंबहुना सर्व सुखी...' या वाक्याच्या जणू परिपूर्तीसाठी धडपडणारे डॉक्टर म्हणून डॉ. गोरे सरांचा उल्लेख करावा लागेल. रुग्णाची प्रकृती पूर्ववत होणे आणि त्यांच्या, कुटुंबियांच्या चेहऱ्यावर हसू येणे या दोन ध्येयासाठी डॉ. गोरे सर अखंड कार्यरत असतात.
कोणतीही वैद्यकीय पार्श्वभूमी नसताना बीडसारख्या भागातून सोलापूरात येऊन 'प्राईड' सारख्या अत्याधुनिक सुविधांनीयुक्त हॉस्पिटलची सुरुवात करणे ही बाब त्यांच्या प्रमाणेच सोलापूरकरांसाठीही 'प्राईड' च ठरली आहे.
--------------------------
हम मौत को हराने की जिद पर अडे हैं l
'तू जश्न की तैय्यारी शुरू कर ए जिंदगी l
हम मौत को हराने की जिद पर अडे हैं l'
हे वाक्य डॉ. गोरे सर अनेकदा म्हणतात. माझ्या रुग्णांवर मृत्यूने कितीही संकटे आणली तरी आम्ही डॉक्टर मृत्यूला हरवून रुग्णाला नवसंजीवनी देणारच हा त्यांचा आशावाद त्यांच्या प्रमाणेच रुग्णांचाही आत्मविश्वास वाढण्यास नक्कीच सहाय्यभूत ठरतो.
------------------------
प्रचंड बुद्धिमत्ता असलेले प्रेमळ डॉक्टर
आजवर हजारो रुग्णांवर केलेले यशस्वी उपचार, अनेकांना मृत्यूच्या दाढेतून परत आणण्याचा अनुभव असूनही प्रेमळ आणि हळव्या मनाचे डॉक्टर अशी डॉ. विशाल गोरे सरांची ख्याती आहे. प्रचंड बुद्धिमत्ता असूनही रुग्णांशी अत्यंत प्रेमाने, मायेने आणि तितक्याच नम्रपणे रुग्णसेवा केल्याचा परीणाम म्हणून हजारो रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यादृष्टीने डॉ. गोरे सरांचे महत्व वेगळे आहे.
एकीकडे कोरोना रुग्णांवर उपचार करण्याच्या अत्यंत व्यस्त वेळापत्रकामुळे घरातच असूनही कुटुंबापासून दूर राहत असल्याची भावना, तर दुसरीकडे कोणाची आई, कोणाचे वडील, कोणाची बहीण, कोणाचा मुलगा वाचविल्यामुळे त्या कुटुंबीयांनी त्यांच्या कुटुंबाचाच एक भाग करून घेतल्याचे समाधान अशा वातावरणात कोरोनाचा काळ गेला. कोरोनाची महामारी सुरू झाल्यानंतर रूग्णांवर उपचार करताना दुसऱ्याच महिन्यात डॉ. गोरे सरांनाच कोरोनाची लागण झाली. परंतु बरे झाल्यानंतर त्यांनी त्वरित पुन्हा कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी धाव घेऊन उपचार करण्यास प्रारंभ केला.
--------------------
हरिची कृपा मानतो संकटाला...
रात्री २ वाजता डॉक्टर गोरे सरांचा फोन वाजतो. हॉस्पिटलमधून निरोप येतो की रुग्ण खूपच अत्यवस्थ आहे. दुसऱ्या क्षणी डॉ. गोरे सर त्या रुग्णाला वाचविण्यासाठी धावून जातात. कोणत्याही डॉक्टरांनी कधीही निरोप आला तर रुग्णसेवेसाठी तयार असावे हा डॉक्टरी क्षेत्रातील संकेत ते तंतोतंत पाळतात. रात्री- अपरात्री येणाऱ्या फोनला संकट न समजता देवाने रुग्ण सेवेची संधीच आहे, अशी त्यांची भावना आहे. रुग्णांना बरे केल्यानंतर डॉ. गोरे म्हणतात, रुग्णाच्या सुख:दुःखात मिसळण्याची संधी मला ईश्वराने दिली, हे माझे भाग्यच आहे.
-----------------------------
यू मस्ट बी एन आर्टिस्ट.....
"मेडिसिन इज एन आर्ट अँड यू मस्ट बी एन आर्टिस्ट" (औषधोपचार ही एक कला आहे. आणि तुम्ही यात चांगले कलाकार असलेच पाहिजे)
हा गुरूमंत्र डॉ. विशाल गोरे सरांचे गुरू डॉ. किरण रूणवाल यांनी त्यांना दिला आहे. त्यांचा छंद असलेल्या अभिनयाच्या क्षेत्राप्रमाणे वैद्यकीय क्षेत्रातही चांगला कलाकार बनण्याचा प्रवास आयुष्यभर अखंड सुरूच असतो. यात प्रगतीचे टप्पे गाठणे हेच खऱ्या कलाकाराचे लक्षण आहे अशी त्यांची प्रामाणिक भावना आहे.
---------------------
डॉ. विशाल गोरे सरांचा शैक्षणिक अन वैद्यकीय प्रवास
* १ ली ते १० वी पर्यंतचे शिक्षण बीड येथील राजस्थानी विद्यालयात
* ११ आणि १२ वी चे शिक्षण लातूर येथील शाहू कॉलेजमध्ये
* MBBS चे शिक्षण औरंगाबाद येथील एमजीएम मेडिकल कॉलेज
* DNB मेडिसिनचे शिक्षण पुणे येथील पुना हॉस्पिटलमध्ये
* पी.जी. डिप्लोमा इन कार्डियॉलॉजी आणि एंडो क्रायनॉलॉजी लंडन येथील रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन
-------
सोलापूरचे 'प्राईड'
सोलापूरकारांसाठी 'प्राईड' (अभिमानास्पद) ठरलेल्या
सात रस्ता येथील त्यांच्या प्राईड हॉस्पिटलमध्ये क्रिटिकल केअर युनिट (ICU), डायलिसिस, सर्व प्रकारच्या अत्याधुनिक शस्त्रक्रिया केल्या जातात.
वैद्यकीय शिक्षणानंतर डॉ. विशाल गोरे सरांनी सोलापूरातील अश्विनी हॉस्पिटल, मार्कंडेय हॉस्पिटल, सीएनएस हॉस्पिटल येथे रुग्णसेवा करीत सात रस्ता येथे स्वतः चे प्राईड आयसीयू अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सुरु केले आहे.
दमा, मधुमेह, थायरॉईड, मेंदूचे विकार, हृदयाचे विकार, संधिवात अशा अनेक आजारांवर डॉ. विशाल गोरे सरांनी हजारो रुग्णांवर उपचार करत त्यांना दिलासा दिला आहे. केवळ कोविडच्याच सुमारे दोन हजार रुग्णांवर त्यांनी उपचार केले आहेत. विशेष म्हणजे कोविड काळात अक्षरशः एकही दिवस सुट्टी न घेता त्यांनी या रुग्णांवर उपचार केले आहेत.
-----------------
छंद माझा वेगळा.....
डॉ. विशाल गोरे सर यांचा व्यवसाय वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित असला तरी त्यांना अभिनयाची प्रचंड आवड आहे. केवळ आवडच नाही तर स्वतः उत्तम अभिनेते आहेत. सुप्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम यांच्या समवेतचा 'जगावेगळी अंत्ययात्रा' हा चित्रपटही प्रदर्शित झाला आहे. शिवाय, 'बंद पाकीट', 'तू वाट पहायची होतीस' लघुपट ही प्रदर्शित झाले आहेत. विशेष म्हणजे राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत डॉ. विशाल गोरे सरांना तब्बल तीन वेळा उत्कृष्ट अभिनेता तर एकदा उत्कृष्ट दिग्दर्शक चे पारितोषिक मिळाले आहे.
------------------
डॉ. दीपाली गोरे यांच्या विषयी....
डॉ. विशाल गोरे यांच्या सुविद्य पत्नी डॉ. दीपाली गोरे या रेडियॉलॉजिस्ट असून त्याही सोलापूरातच वैद्यकीय व्यवसाय करतात. कोरोनाच्या पहिल्या लाटेत त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णसेवा केली. या दरम्यान त्यांना स्वतः ला कोरोनाची बाधा झाली. कोरोनाच्या गंभीर अवस्थेतून त्या बऱ्या होऊन पुन्हा त्यांनी रुग्णसेवा कायम ठेवली.
----------------
माझा परिवार
डॉ. विशाल गोरे यांच्या परिवारात पत्नी डॉ. दीपाली यांच्या समवेत मुलगा.....आहे. वडील विठ्ठल गोविंदराव गोरे हे निवृत्त प्राध्यापक असून आई विमल विठ्ठल गोरे या गृहिणी आहेत.
डॉ. गोरे यांना दोन बहिणी असून यातील एक बहीण डॉक्टर तर एक बहीण उच्चशिक्षित आहे.
------------------- (वाणिज्य वार्ता)