कौतुकास्पद ! पर्यावरणपूक गणेश मूर्तीसाठी महिला मूर्तिकारांचा पुढाकार

गणेश मूर्तीसह दिली जाते काळी माती व बिया मोफत : सन्मानपत्र देऊन करतात गौरव

कौतुकास्पद ! पर्यावरणपूक गणेश मूर्तीसाठी महिला मूर्तिकारांचा पुढाकार

साेलापूर : प्रतिनिधी

अलिकडच्या काळात पर्यावरणपूरक गणेश मूर्ती प्रतिष्ठापित करण्याचा ट्रेंड वाढत आहे. तसेच मध्यंतरी कोरोना कालावधीत सार्वजनिक गणेशोत्सवासह सर्वच उत्सवांवर निर्बंध होते. अशातच गणपती उत्सव मिरवणूका, मंडप, आरास आणि विसर्जन यांच्यावरही कडक निर्बंध आले. पूर्वीपासून सुरू असलेला पारंपारिक मार्तीच्या मूर्तींच्या उत्सवाला या काळात चांगली संधी निर्माण झाली. घरच्याघरी मातीच्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना आणि विसर्जन करण्यात आले. सध्याला सोलापूरातील काही महिला मूर्तिकार यासाठी पुढाकार घेत आहेत.

मागील १२ वर्षांपासून मधूर सोलापूरकर या वृक्ष विनायक ही संकल्पना राबवत आहेत. पर्यावरण रक्षणाचा जणू त्यांनी विडाच उचलला आहे. विविध प्रकारच्या मातींचे कंपाऊंड व काही संस्कृतीस अनुसरून वस्तूंचा वापर करीत त्यांच्या शिवकृपा बहुउद्देशीय समाजसेवी संस्थेच्या माध्यमातून या मूर्ती बनवल्या जातात. मातीच्या खरेदीपासून, त्याचे मिश्रण तयार करणे, त्या लगद्यापासून साच्यातून मूर्ती बनवणे, रंगरंगोटी आणि त्याच्या विक्री व्यवस्थापनेपासून प्रसिद्धीचे काम केवळ महिलाच करतात. यात संस्थेच्या वैशाली गुंड, आरती आरगडे, श्रीदेवी पाटील, छोट कलाकार समृद्धी, आनंदी, आर्यन यांच्यासह अनेकांचा हातभार असतो.

वृक्षविनायकाचे वैशिष्ट्य

वृक्षविनायक गणपती मूर्ती बनविताना माती, हळद, खळ, भिमसेनी कापूर, गाईचे शेण, डिंक यांचा वापर केला जातो. मूर्ती बनविताना पावित्र्य राखले जाते. रंगकामासाठी खायचे रंग, अरगजा, हळद कुंकू व वॉटर कलरचा वापर केला जातो. मूर्ती घेणाऱ्या ग्राहकाला पुन्हा काळी माती, विविध प्रकारच्या घरगुती झाडांच्या बिया मोफत दिल्या जातात, जेणेकरून मूर्ती घरात विसर्जित केल्यावर त्याच मातीत काळी माती मिसळत बिया लावल्या जाव्यात व त्यांचा वृक्ष विनायक त्यांच्याच घरात एका वृक्षाच्या रूपाने रहावा, हा यामागचा उद्देश आहे. तसेच प्रत्येक ग्राहकाचा पर्यावरण रक्षक म्हणून सन्मानपत्र देऊन गाैरविण्यात येते. बाळीवेस येथील लातूर बँकेवरील जाजू भवन येथे हे मूर्ती विक्री केंद्र सकाळी १० ते रात्री १० यावेळेत सुरु आहे.

व्यवसायासोबत पर्यावरण रक्षण
केवळ व्यवसाय म्हणून आम्ही मूर्ती विक्री करत नाही. प्रदूषण टाळत पर्यावरणाच्या रक्षणाचे काम आम्ही आमच्यापरिने करतो. अवघ्या १५१ रूपयांपासून उंचीने अडीच फुटांपर्यंतच्या गणेशमूर्ती असतात. वर्षभर मूर्ती बनविण्याचे काम चालते, ते जे समाधान आहे, ते वेगळे आहे.

- मधूर सोलापूरकर, वृक्ष विनायक परिवार प्रमुख