कणखर शासन व्यवस्थेतील लोकसहभाग हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचे वैशिष्ट्य

गोविंद काळे : शेठ लोणकरणजी चंडक स्मृती व्याख्यानमालेचा समारोप

कणखर शासन व्यवस्थेतील लोकसहभाग हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचे वैशिष्ट्य

सोलापूर : प्रतिनिधी

रयतेचे कल्याण हा एकमेव ध्यास घेऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी राज्यकारभार केला. कणखर शासन व्यवस्थेतील लोकसहभाग हे अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचे वैशिष्ट्य होते, असे प्रतिपादन अभ्यासक गोविंद काळे यांनी केले. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सोलापूर आणि शेठ लोणकरणजी जगन्नाथजी चंडक ट्रस्टतर्फे आयोजित तीन दिवसीय व्याख्यानमालेचे तिसरे आणि अखेरचे पुष्प कवी गोविंद काळे यांनी मंगळवारी हि. ने. वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहात गुंफले. व्याख्यानमालेचे हे २७ वे वर्ष होते. 

'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे प्रशासन' असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. याप्रसंगी व्यासपीठावर शेठ लोणकरणजी जगन्नाथजी चंडक ट्रस्टचे कार्यवाह डॉ. गिरीष चंडक, संयोजक किशोर चंडक, मसाप सोलापूर शाखेच्या अध्यक्षा डॉ. श्रुतीश्री वडगबाळकर, प्रा. डॉ. सुवर्णा गुंड उपस्थित होते.

वक्ते श्री. काळे म्हणाले, जन्मजात कणखरपणा लाभलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी मुत्सद्दीपणे राज्यकारभार केला. राज्याच्या हितासाठी पतीलाही विरोध करण्याच्या त्यांच्या स्वभावातून राज्याविषयीची त्यांची अत्यंतिक निष्ठा स्पष्ट होते.

ज्या मुत्सद्दीपणाने त्यांनी राज्यावर आलेले युद्धाचे संकट दूर केले. तितक्याच कठोरपणे त्यांनी दारूबंदी, हुंडाबंदी असे कठोर नियम लागू करत त्याची अंमलबजावणी केली. सामाजिक रुढींचा पगडा असलेल्या २५० वर्षांपूर्वी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी घेतलेले निर्णय म्हणजे सामाजिक क्रांतीच होती. प्रजेला न्याय लवकर मिळावा, तो मोफत मिळावा आणि तो दोन्ही बाजूंना मान्य व्हावा याकरिता न्याय व्यवस्थेत त्यांनी बदल केले. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी कडक कायदे केले. कर आकारणीची पद्धत आणि निकष बदलून रयतेला दिलासा दिला. प्रशासक चांगला असेल तर केलेल्या नियमांची अंमलबजावणी उत्तमरीत्या होते हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी दाखवून दिले, असे श्री. काळे म्हणाले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केलेले जलसंधारणाचे काम न 'भूतो न भविष्यती' असेच आहे. त्यांनी बांधलेल्या विहिरी, बारवा, घाट पुढील अनेक वर्षे प्रजेसाठी उपकारक ठरल्या. पर्यटनाला प्रोत्साहन पुणे ते महेश्वर टपाल सेवा अशा सुविधा तयार करून राज्यकारभारात आधुनिकता आणण्यात त्या यशस्वी ठरल्या, असेही श्री. काळे यांनी सांगितले.

वंदना कुलकर्णी यांनी परिचय करुन दिला. ट्रस्टचे विश्वस्त किशोर चंडक यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. सुवर्णा गुंड यांनी सूत्रसंचालन तर बदीउज्जमा बिराजदार यांनी आभार प्रदर्शन केले.
-----------