इंग्रजांपूर्वी हजारो वर्षांपासून भारत होता अतिप्रगत
डॉ. रवींद्र मिणीयार : जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळ व्याख्यानमालेचा समारोप
सोलापूर : प्रतिनिधी
आधुनिक ज्ञान, अनेक संशोधन, विज्ञान हे इंग्रजांनी भारतीयांना शिकवले हा खूप मोठा भ्रम आहे.
इंग्रजांपूर्वी हजारो वर्षांपासून भारत या सर्व क्षेत्रांमध्ये अतिप्रगत होता, असे प्रतिपादन डॉ. रवींद्र मिणीयार यांनी केले. जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळाच्या ४७ व्या वर्षाच्या व्याख्यानमालेचा समारोप बुधवारी झाला. व्याख्यानमालेचे चौथे आणि शेवटचे पुष्प डॉ. मिणीयार यांनी शिवस्मारक सभागृहात गुंफले.
प्रारंभी श्री गणेशाचे पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर सोलापूर जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे, संचालक आनंद कुलकर्णी, उत्सव अध्यक्षा शैलजा देशपांडे उपस्थित होते.
'स्वर्णिम भारत' या विषयावर डॉ. मिणीयार यांनी सोलापूरकरांना संबोधित केले. डॉ. मिणीयार म्हणाले, प्राचीनकाळी आजचा रशिया, इराण, इराक, म्यानमार, पाकिस्तान, सिंगापूर, ब्रह्मदेश, श्रीलंका मिळून संपूर्ण जम्बुद्वीप म्हणजेच भारत होता. विज्ञान आणि अध्यात्माची सांगड घालून खगोलशास्त्र, गणित, संगीत, आयुर्वेद, स्थापत्यशास्त्र अशा अनेक क्षेत्रांमध्ये भारताने मोठे शोध लावले होते. गुरुत्वाकर्षण, प्लास्टिक सर्जरी, शून्याचा शोध, पृथ्वीचे भ्रमण, ग्रहण, याची सर्वप्रथम माहिती भारतीयांनी जगाला दिली. सध्या बँकांमध्ये वापरले जाणारे धनादेश देण्याची सुरुवातही भारतातील गुप्त आणि मौर्यांच्या काळातील आहे. संपूर्ण भारतीय संस्कृतीच विज्ञानावर आधारित आहे. सहाव्या शतकात प्लास्टिक सर्जरीचा शोध लावणाऱ्या सुश्रुत यांचा पुतळा ऑस्ट्रेलियातील विद्यापीठात आहे हे डॉ. मिणीयार यांनी सांगताच सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला.
प्राचीनकाळी प्रगत असलेला भारत देश आधुनिक काळातही मोठी घोडदौड करीत आहे. रेल्वे, महामार्ग, विमानतळ, वीज निर्मिती, इंटरनेट, शिक्षण, आरोग्य अशा अनेक क्षेत्रात भारत इतर देशांच्या तुलनेत पुढे जात आहे. भारताची ही विकासगंगा अशीच प्रवाहित राहिली तर भारत महासत्ता नक्की होईल असेही डॉ. रवींद्र मिणीयार यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी व्याख्यानमाला समितीचे प्रमुख मदन मोरे उपस्थित होते. संजोगिता चौधरी यांनी सूत्रसंचालन तर उत्सव अध्यक्षा शैलजा देशपांडे यांनी आभार प्रदर्शन केले.
---------