दक्षिण सोलापूरच्या उमेदवारीवरून शिवसेना आक्रमक
काँग्रेसने दबावतंत्र वापरल्यास शहर मध्य आणि अक्कलकोटला शिवसेना भरणार फॉर्म : शिवसेना उपनेते शरद कोळींचा इशारा
सोलापूर : प्रतिनिधी
दक्षिण सोलापूर विधानसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवारीवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आक्रमक झाली आहे. शुक्रवारी माजी आमदार दिलीप माने यांच्या घरासमोर झालेल्या कार्यकर्त्यांच्या गोंधळसदृश्य सभेनंतर शनिवारी शिवसेनेच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर केली.
शिवसेनेकडून अमर पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या समर्थकांनी शुक्रवारी श्री. माने यांच्या निवासस्थानासमोर एकत्र येत दिलीप माने यांच्या उमेदवारीचा आग्रह धरला. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी काँग्रेसकडून माजी आमदार दिलीप माने यांनाच दक्षिण विधानसभेतून उमेदवारी मिळेल, असे काँग्रेस कार्यकर्त्यांना सांगितले. यानंतर दक्षिण सोलापूर विधानसभेत वादास तोंड फुटले आहे.
यावेळी शिवसेनेचे उपनेते शरद कोळी म्हणाले, महाविकास आघाडीत बिघाडी होईल असे काम काँग्रेसने करू नये. काँग्रेसने आमच्यावर दबाव टाकल्यास आम्हालाही दबाव तंत्र वापरता येते. शिवसेनेवर दबाव तंत्र वापरल्यास काँग्रेसला अवघड जाईल. काँग्रेसने दक्षिण सोलापूर विधानसभेत शिवसेनेची अडचण केल्यास शहर मध्ये आणि अक्कलकोट विधानसभेमध्ये शिवसेनेचा उमेदवार आम्ही देऊ, असा इशाराही शिवसेनेचे उपनेते शरद कोळी यांनी याप्रसंगी दिला.
शिवसेनेचे उमेदवार अमर पाटील म्हणाले, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) यांच्या महाविकास आघाडीतर्फे शिवसेनेकडून मला दक्षिण सोलापूर विधानसभेसाठी उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांनी कोणतेही गैरसमज न पसरवता आघाडीचा धर्म पाळून शिवसेनेला सहकार्य करावे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः मला एबी फॉर्म दिलेला आहे. एखाद्या व्यक्तीस दिलेला एबी फॉर्म रद्द झाल्याची घटना आजवर इतिहासात कधीही घडलेली नाही. हा एबी फॉर्म देताना महाविकास आघाडीतील नेत्यांशी चर्चा करूनच देण्यात आलेला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून माझी उमेदवारी अंतिम आहे. खासदार प्रणिती शिंदे यांच्या विजयामध्ये शिवसेनेचा सिंहाचा वाटा आहे हे काँग्रेसने विसरता कामा नये. मी सोमवारी २८ ऑक्टोबर रोजी विधानसभेसाठी अर्ज भरणार असून यावेळी महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाच्या नेत्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन ही शिवसेनेचे उमेदवार अमर पाटील यांनी याप्रसंगी केले.
या पत्रकार परिषदेस शिवसेनेच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड, लोकसभा प्रमुख पुरुषोत्तम बरडे, जिल्हाप्रमुख गणेश वानकर, उपजिल्हाप्रमुख भीमाशंकर म्हेत्रे, उपजिल्हाप्रमुख संतोष पाटील, शहर प्रमुख शरणराज केंगनाळकर आदी उपस्थित होते.