अरे वा ! पोलिस उपायुक्त करत आहेत ढोल ताशांचा सराव !
मानाचा श्री आजोबा गणपती मंडळाच्या मिरवणुकीत करणार वादन
पुरुषोत्तम कारकल
सोलापूरकरांना यंदाच्या गणेशोत्सव मिरवणुकीत पोलीस खात्याचे एक वेगळेच चित्र पाहायला मिळणार आहे. कारण सोलापूर शहराच्या पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर यंदा श्री श्रद्धानंद समाज सार्वजानिक मानाचा श्री आजोबा गणपती मंडळ ट्रस्टच्या ढोल - ताशा पथकासोबत वादन करताना दिसणार आहेत. प्रचंड व्यस्तता असूनही सध्या त्या शिवस्मारक पटांगणात श्री आजोबा गणपती मंडळाच्या पथकासोबत सरावही करीत आहेत.
पोलीस खाते म्हटले की गुन्हेगारांचा कर्दनकाळ असलेले, समाजात उपद्रव निर्माण करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना शासन करणारे अशी प्रतिमा दिसते. परंतु हे करण्याबरोबरच रोजच्या अत्यंत धकाधकीच्या आणि व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून आपला छंद जोपासण्याासाठी पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडुकर यांनी या ढोल - ताशा पथकात आवडीने सहभाग घेतला आहे. यंदाच्या गणेशोत्सव मिरवणुकीतही त्या बंदोबस्तातून काहीसा वेळ काढून त्या सहभागी होणार आहेत.
---------
समाजाच्या परिवर्तनाची नांदी
पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडुकर यांच्यासारख्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी आमच्या श्री आजोबा गणपती मंडळाच्या ढोल - ताशा पथकात वादन करणे ही निश्चितच आमच्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. उत्सवाचे स्वरूप बदलत आहे. ही समाजाच्या परिवर्तनाची नांदी आहे.
-- गंगाधर गवसने, श्री आजोबा गणपती मंडळाचे ढोल - ताशा पथक प्रमुख
----------
आमचा आनंद द्विगुणित
ढोल - ताशा वादन हे अनेक पारंपारिक वादनापैकी एक आहे. गेल्या काही वर्षांपासून ढोल ताशा पथकांची संख्या वाढत आहे ही चांगली बाब आहे. अशातच पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर यांनी ढोल - ताशा पथकात सहभाग घेतल्यामुळे आमचा आनंद द्वीगुणित झाला आहे.
-- नागेश भोसेकर, मानाचा श्री आजोबा गणपती मंडळ ढोल पथकाचे प्रशिक्षक
---------------
आवड आणि संस्कृती जपण्यासाठी सहभाग
गणेशोत्सव हे समाजप्रबोधनाचे माध्यम आहे. त्यामुळे गणेशोत्सवासारख्या भक्तीमय आणि उत्साहवर्धक सणांमध्ये डॉल्बी लावून इतरांना त्रास देण्यापेक्षा ढोल - ताशा पथकासारख्या अनेक पारंपारिक वादनांकडे समाजाने वळण्याची आता आवश्यकता आहे. डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा संकल्प प्रत्येक मंडळाने केला पाहिजे. फक्त डॉल्बीला विरोध करण्यापेक्षा त्याला चांगला पर्याय काय असू शकतो, त्याचे उदाहरण समाजासमोर ठेवण्यासाठी मी स्वतः मानाचा श्री आजोबा गणपती मंडळाच्या ढोल - ताशा पथकात सहभाग घेतला आहे. आवड आणि संस्कृती जपण्याचे उत्तम माध्यम म्हणून मी ढोल ताशा पथकात वादनाचा निर्णय घेतला. सर्वांना विधायक गणेशोत्सवाच्या शुभेच्छा !
-- डॉ. वैशाली कडूकर, पोलीस उपायुक्त, सोलापूर