अन्यथा कार्यक्रम उधळून लावू

भाजयुमोने दिला इशारा : काय आहे प्रकरण वाचा ? वाचा !

अन्यथा कार्यक्रम उधळून लावू

सोलापूर : प्रतिनिधी

देशाचा शत्रू असलेल्या आक्रमक टिपू सुलतानचे उदात्तीकरण करणाऱ्या कार्यक्रमावर बंदी घाला आणि धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या समाजकंटकांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाने गुरूवारी केली. याबाबत पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की, गाजिउद्दीन रिसर्च सेंटर नामक संस्थेने सोलापुरात शुक्रवार ८ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात 'मुसलमानों की तारीख और टिपू सुलतान की बदनामी : एक फॅसिस्ट साजिश' नामक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात हजारो हिंदूंची कत्तल करणारा भारताचा शत्रू टिपू सुलतान याचे उदातीकरण होणार आहे, असे वाटलेल्या पत्रकावरून दिसून येत आहे. टिपू सुलतानने लिहिलेल्या पत्रांचे मराठी भाषांतर केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन, राम पुनियानी सामाजिक शांततेला बाधा आणणाऱ्या इसमाचे आर.एस.एस. भाजपा विचारधारा और राजनीतिक अजेंडा नामक पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. तसेच राम पुनियानी या व्यक्तीचे 'भाजप प्रणित टिपू सुलतान यांची बदनामी व वास्तव' अशा अत्यंत आक्षेपार्ह आणि वादग्रस्त विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. शिवाय 'भाजपाच्या विद्वेषी राजकारणाचा सांस्कृतिक आधार व भारतीय इतिहास' या विषयावर राजू परुळेकर नामक व्यक्ती बोलणार आहे.

हा संपूर्ण कार्यक्रम समस्त हिंदू समाजाच्या भावना दुखावणारा, जगभरातील हिंदूंची सर्वात मोठी सांस्कृतिक संघटना असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बदनामी करणारा आणि सांस्कृतिक राष्ट्रवादाची भूमिका घेऊन काम करणाऱ्या भारतीय जनता पार्टीची बदनामी करणारा हा कार्यक्रम आहे. त्यामुळे या कार्यक्रमावर बंदीच घातली गेली पाहिजे. तसेच समाजातील शांतता व सुव्यवस्था बिघडवणाऱ्या या कार्यक्रमाच्या संयोजकांवर धार्मिक भावना भडकावण्याचे आणि सामाजिक शांततेला बाधा आणल्याबद्दल गुन्हे दाखल करून त्यांच्यावर अत्यंत कठोर कारवाई व्हावी. या कार्यक्रमावर बंदी घातली गेली नाही तर भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हा कार्यक्रम उधळून लावतील असा इशाराही भारतीय जनता युवा मोर्चाच्या आक्रमक कार्यकर्त्यांनी गुरुवारी दिला.

भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष डॉ. किरण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या आंदोलनाप्रसंगी भाजयुमो शहर सरचिटणीस पंकज काटकर, रवी कोटमाळे, शिवराज झुंजे, नागेश येळमेली, प्रेम भोगडे, नरेंद्र पिसे, संस्कार नरोटे, समर्थ होटकर, रोहन सोमा, भार्गव बच्चू, योगेश सरशेट्टी,  पवन अलुरे, हरिप्रसाद बंडेवार, दीपक जाधव, कुमार गदगे, विनोद करली आदींसह सोलापूर शहर भाजयुमोचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.