यंदा शिवजयंतीला सोलापूरात परवानगी नाही

पोलिस प्रशासनाने स्पष्ट केली भूमिका

यंदा शिवजयंतीला सोलापूरात परवानगी नाही

सोलापूर : प्रतिनिधी
यंदाच्यावर्षी सोलापूरात शिवजयंती सार्वजनिकरित्या साजरी करण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून परवानगी देणार नसल्याचे पोलिस उपायुक्त डॉ. वैशाली कडुकर यांनी 'महाबातमी' शी बोलताना सांगितले. गेल्या अनेक दिवसांपासून सोलापूरकरांना प्रतीक्षा लागून राहिलेल्या शिवजयंतीच्या विषयावर पडदा पडला आहे.

सोलापूरात पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. मोठ्या मिरवणुकाही काढल्या जातात. मात्र कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षभरात कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी देण्यात आलेली नाही. कोरोना प्रादुर्भाववामुळे लागू करण्यात आलेले नियम २८ फेब्रुवारी पर्यंत वाढवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे यंदा सार्वजनिकरित्या साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीला परवानगी नाकारल्याचे पोलिस उपायुक्त डॉ. कडुकर म्हणाल्या.

शिवजयंतीसाठी पोलिस प्रशासनाने लावलेले नियम :-
१) शिवजयंतीच्या मिरवणुका काढण्यास परवानगी नाही.
२) चौकात, मुख्य रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी मंडप टाकून मूर्ती, प्रतिमा लावण्यास बंदी.
३) शिवजयंती निमित्त सार्वजनिक ठिकाणी ५ पेक्षा अधिक लोक एकत्र येण्यास बंदी.
४) पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे, प्रतिमेचे पूजन घरात, कार्यालयात, बंदिस्त ठिकाणी ५ संख्येने करण्यास हरकत  नाही.

मोठ्या उत्साहात निघणाऱ्या शिवजयंतीच्या मिरवणूका यंदा होणार नसल्याने शिवप्रेमींमध्ये नाराजी आहे. तर दुसरीकडे कोरोना महामारीचा प्रादुर्भाव अद्याप पूर्णपणे संपला नसल्याने पुन्हा संसर्ग होऊ नये यासाठी कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी न देण्याची भूमिका शासनाने आणि पोलिस प्रशासनाने घेतली आहे.