अन् सोलापूर शहर स्तब्ध झाले....!

सोलापूरकरांनी गायले सामूहिक राष्ट्रगीत

अन् सोलापूर शहर स्तब्ध झाले....!

सोलापूर : प्रतिनिधी

सकाळचे १०.३० वाजले अन् सोलापूरकरांची एकच लगबग सुरू झाली. प्रत्येक जण ठरवलेल्या ठिकाणी वेळेपूर्वी पोहोचण्यासाठी धावपळ करत होता. सकाळचे ११ वाजले अन् सोलापूर जणू स्तब्ध झाले. सोलापूरकरांनी चौकाचौकात, सार्वजनिक ठिकाणे, शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालय अशा सर्व जागांवर सामूहिक राष्ट्रगीत गाऊन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा केला.

भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संपूर्ण देशभर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. या अंतर्गत शासनाने आवाहन केल्यानुसार ९ ते १७ ऑगस्ट दरम्यान सुराज्य महोत्सव साजरा करण्यात येत आहे. यात विविध कार्यक्रम बरोबरच १७ ऑगस्ट रोजी सर्वत्र सकाळी ११ वाजता सामूहिक राष्ट्रगीत उपक्रम व्हावा असे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनास प्रतिसाद देत सोलापूरकरांनी सामूहिक राष्ट्रगान कार्यक्रमात हिरहिरीने सहभाग घेतला.

सात रस्ता, नवी पेठ, सरस्वती चौक सुभाष चौक, गांधीनगर, श्री रूपाभवानी मंदिर परिसर, तुळजापूर नाका, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, कुंभारवेस आदी शेकडो ठिकाणी एकाचवेळी राष्ट्रगीत सुरु झाले.

राष्ट्रगीत सुरू होण्यापूर्वी संपूर्ण शहरातील वाहतूक थांबली होती. चौका चौकात नागरिक सिग्नलवर उभे राहून राष्ट्रगीत म्हणताना दिसत होते. या उपक्रमातून सोलापूरकरांच्या देशप्रेमाच्या भावनेचे दर्शन घडले.