तब्बल ७५ वर्षांपूर्वीचा तिरंगा ध्वज आहे सोलापूरात

ॲड. जे. जे कुलकर्णी यांनी केला जतन

तब्बल ७५ वर्षांपूर्वीचा तिरंगा ध्वज आहे सोलापूरात

पुरुषोत्तम कारकल 

भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले. यादिवशी संपूर्ण देशाप्रमाणे सोलापूरातही अनेक ठिकाणी तिरंगा ध्वज फडकले. यातील एक तिरंगा ध्वज मात्र अद्याप जपून ठेवण्यात आला आहे. हे विशेष !  सोलापूरातील ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. जे. जे. कुलकर्णी यांनी हा ध्वज जपून ठेवला आहे.

ॲड. जे. जे. कुलकर्णी यांचे वडील ॲड. जगन्नाथ एकनाथ उपाख्य जे. ई. कुलकर्णी यांनी १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पहिल्या दिवशी मोठ्या आनंदाने खादीचा तिरंगा विकत घेतला आणि घरावर अभिमानाने फडकावला. ते हयात असण्याच्या इ. स. १९७० सालापर्यंत स्वातंत्र्याच्या पहिल्या दिवशी खरेदी केलेला हा ध्वजच दरवर्षी १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी रोजी फडकावित होते. त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र ॲड. जे.जे. कुलकर्णी यांनी दरवर्षी हाच ध्वज वापरण्याची प्रथा जपून ठेवली आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी दिनीही यंदा १५ ऑगस्ट रोजी त्यांनी हा तब्बल ७५ वर्षे जपून ठेवलेला ध्वज पूजन करून फडकावला.

अनेक दशकांच्या स्वातंत्र्य युद्धानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले. यानंतर अनेकांनी स्वातंत्र्याच्या आठवणी वेगवेगळ्या जपल्या. मात्र कुलकर्णी परिवाराने जपलेली ही आठवण खरोखरीच वैशिष्टयपूर्ण आहे. 

याबाबत  जेष्ठ विधीज्ञ जे. जे. कुलकर्णी काय म्हणाले पहा.