बिग ब्रेकिंग ! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजीनामा
कोण होणार मुख्यमंत्री ?
सोलापूर : प्रतिनिधी
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांची भेट घेऊन राजीनामा दिला. विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला घवघवीत यश मिळाल्यानंतर आता नवा मुख्यमंत्री कोण होणार ? याची चर्चा सुरू झाली आहे.
नियमाप्रमाणे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिल्यानंतर शपथविधीपर्यंत श्री. शिंदे यांनाच काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहण्याच्या सूचना राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी दिल्या आहेत. त्यामुळे आगामी शपथविधीच्या समारंभापर्यंत एकनाथ शिंदे हे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून राज्याचा कारभार पाहणार आहेत.
याबाबत दीपक केसरकर माध्यमांशी बोलताना म्हणाले, काही दिवसातच नवीन सरकार स्थापन होणार आहे. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे तीनही नेते एकत्र बसून चर्चा करणार आहेत. महाराष्ट्राचे नूतन मुख्यमंत्री कोण होतील याचा निर्णय वरिष्ठ स्तरावर होणार आहे.
आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा, अशी भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जो निर्णय घेतील तो निर्णय राज्यातील तीनही नेत्यांना मान्य असेल, असेही दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज नसल्याचेही स्पष्टीकरण श्री. केसरकर यांनी याप्रसंगी दिले.
मुख्यमंत्री शिंदे यांनी राजीनामा दिल्यानंतर पुढील मुख्यमंत्री ठरवण्याच्या प्रक्रियेला आता वेग येणार आहे. मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस बसणार की ज्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक झाली ते विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बसणार की नेहमीप्रमाणे धक्कातंत्राचा वापर करीत दिल्लीतील भाजपाचे वरिष्ठ अजित पवारांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ घालणार हे आगामी काही काळातच स्पष्ट होणार आहे.