सर्वांच्या सहभागाने शतक महोत्सवी नाट्यसंमेलन होणार ऐतिहासिक

कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर : नाट्य संमेलनाच्या मंडपाचे भूमिपूजन

सर्वांच्या सहभागाने शतक महोत्सवी नाट्यसंमेलन होणार ऐतिहासिक

सोलापूर : प्रतिनिधी

सर्वांच्या सहभागातून सोलापुरात होणारे शतक महोत्सवी विभागीय नाट्य संमेलन ऐतिहासिक होईल, असा विश्वास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांनी व्यक्त केला. २६, २७,२८ जानेवारी होणाऱ्या नाट्य संमेलनाच्या मंडपाचे भूमिपूजन मंगळवारी कुलगुरू डॉ. महानवर यांच्या हस्ते कुदळ मारून नॉर्थकोट प्रशालेच्या मैदानावर झाले.

यावेळी विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा, पोलिस उपायुक्त विजय कबाडे, सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजी सावंत, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, शहाजी पवार, अविनाश महागावकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, शिवसेना समन्वयक माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, नाट्य संमेलनाचे प्रमुख कार्यवाह विजय साळुंके, समन्वयक मोहन डांगरे, स्वागत सचिव प्रशांत बडवे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. देवानंद चिलवंत, नाट्य संमेलनाचे समन्वयक कृष्णा हिरेमठ यांची प्रमुख उपस्थिती होती. 

कुलगुरु डॉ. महानवर म्हणाले, नाट्य संमेलना दरम्यान होणाऱ्या कार्यक्रमांपैकी काही कार्यक्रम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात घेता येऊ शकतील. त्याकरिता लागेल ते सर्व सहकार्य विद्यापीठाकडून केले जाईल.

पोलिस उपायुक्त विजय कबाडे म्हणाले, सोलापूरचे सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान मोठे आहे. शतक महोत्सवी विभागीय नाट्यसंमेलनही सोलापूरच्या इतिहासात नोंद करण्यासारखे होईल. सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे म्हणाले, शतक महोत्सवी विभागीय नाट्य संमेलन यशस्वी होण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेकडून सर्वतोपरी सहकार्य करू. माजी आमदार प्रकाश यलगुलवार म्हणाले, ८८ व्या नाट्यसंमेलनापेक्षादेखील १०० वे विभागीय नाट्य संमेलन दिमाखदार होईल.

गोविंद गवई यांनी पौरोहित्य केले. नाट्यसंमेलनाचे प्रमुख कार्यवाह विजय साळुंके यांनी प्रास्ताविक केले.

याप्रसंगी हरिभाऊ चौगुले, रणजीत गायकवाड, माजी नगरसेवक विनोद भोसले, प्रा. डॉ. वीरभद्र दंडे, शशिकांत पाटील, गुरुराज यल्लटी, प्रशांत शिंगे, शिवाजी उपरे, अनिल पाटील, सुशांत कुलकर्णी, शाहीर रमेश खाडे, भगवान मुंढे आदी उपस्थित होते.