काश्मीर फाइल्स पहा आणि चक्क ३३ टक्क्यांपर्यंत सूट मिळवा
सोलापूरातील व्यापारी चित्रपटाच्या समर्थनार्थ देताहेत भरघोस सूट
सोलापूर : प्रतिनिधी
कोणी हॉटेलमधील जेवणाच्या बिलावर १० टक्के सूट, कोणी चाट पदार्थांवर २५ टक्क्यांची सूट तर कोणी सुप्रसिद्ध बटाटेवड्यांवर ३३ टक्क्यांपर्यंत सूट सोलापूरात देत आहे. तर कोणी चक्क जेवणच मोफत देत आहे. 'काश्मीर फाईल्स' चित्रपट पहा आणि या चित्रपटाचे तिकीट दाखवून भरघोस सूट मिळवा, अशा योजना सोलापूरातील व्यापारी, व्यावसायिकांनी जाहीर केल्या आहेत. सोलापूरात याची एकच चर्चा रंगली आहे.
'काश्मीर फाइल्स' हा हिंदी चित्रपट ११ मार्च रोजी जगभर प्रदर्शित झाला. चित्रपट प्रदर्शित होताच प्रेक्षकांनी या चित्रपटाला डोक्यावर घेतले. सोलापूरातील चित्रपट प्रदर्शित झालेल्या भागवत उमा मंदिर, लक्ष्मीनारायण टॉकीज, ई स्क्वेअर अशा सर्व चित्रपटगृहांत हा चित्रपट हाऊसफुल झाला आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची मोठी गर्दी दररोज होत आहे.
१९९० साली भारताचा अविभाज्य भाग असलेल्या काश्मीरमध्ये जिहादी आतंकवाद्यांनी काश्मीरमधील हिंदूंवर केलेल्या अनन्वित अत्याचारांची कहाणी या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. आजवर केवळ ऐकीव असलेला इतिहास दृश्य माध्यमातून जाणून घेता येत असल्यामुळे प्रेक्षकांची या चित्रपटाला मोठी पसंती लाभत आहे.
काश्मीर फाइल्स हा चित्रपट अधिकाधिक नागरिकांनी पहावा, यासाठी सोलापूरातील अनेक व्यावसायिक, दुकानदार, हॉटेल मालक यांनी ३१ मार्चपर्यंत विविध योजना जाहीर केल्या आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (पार्क चौक) येथील मिष्टी बाय याना या दुकानात अनेक प्रकारच्या चाट पदार्थांवर तब्बल २५ टक्क्यांपर्यंत सूट देण्यात आली आहे, असे हेमंत शहा यांनी सांगीतले. पाणीपुरी, शेवपुरी, दही शेवपूरी, चौपाटी भेळ, बास्केट चार्ट, स्पेशल भेळ, राजकोट चार्ट, चायनीज भेळ, समोसा चाट, रगडापुरी चाट, रगडा पॅटीस अशा अनेक पदार्थांवर दररोज दुपारी ४ ते रात्री १०.३० पर्यंत २५ टक्के सूट देण्यात येत आहे.
नवी पेठ येथील भाग्यश्री चिवडा येथे प्रसिद्ध बटाटेवड्यांवर तब्बल ३३ टक्के सूट दिली जात आहे, असे अभय जोशी म्हणाले. नवीपेठमधील माऊली नॅपकिन बुकेचे ज्ञानेश्वर म्याकल यांनी बुके खरेदीवर २५ टक्क्यांची सूट जाहीर केली आहे. निलम नगर येथील हॉटेल विकासमध्ये काश्मिर फाइल्स आणि पावनखिंड चित्रपट पाहणाऱ्यास जेवण मोफत देणार असल्याचे जाहिर करण्यात आले आहे.
तिर्हे येथील हॉटेल मातोश्रीमध्ये जेवणाच्या एकूण बिलावर १० टक्के सूट देण्यात येत असल्याचे प्रसाद गवळी म्हणाले. तर शिवस्मारकजवळील भारतीय जेनरिक औषधी केंद्र येथे जेनेरिक औषधांवर पूर्वी असलेल्या ३० ते ७० टक्के सवलतीशिवाय आणखी दहा टक्क्यांची सवलत देण्यात येत असल्याचे साईराम येराबोजू यांनी सांगितले.
ॲड. योगेश कुलकर्णी यांनी सोलापूरातील जो कोणी या सिनेमाचे तिकीट दाखवेल त्याला कायदेविषयक सल्ला/ सहाय्य माझ्याकडून मोफत मिळेल. त्यांची काही कोर्ट केस असेल तर कोणतीही फी न घेता चालवेन, असे जाहीर केले आहे. सोलापूरातील या व्यापारी, दुकानदार, हॉटेल चालकांच्या या उपक्रमाला सोलापूरकरांनी भरभरून पाठिंबा देत समर्थन दिले आहे. अधिकाधिक नागरिकांनी हा चित्रपट पहावा, सत्य इतिहास जाणून घ्यावा यासाठी हा उपक्रम केल्याचे दुकानदार, हॉटेल चालक, व्यवसायिकांनी 'महाबातमी न्यूज पोर्टल' ला सांगितले.
----------------------
केवळ चित्रपट नव्हे तर लोकचळवळ
काश्मीर फाइल्स हा चित्रपट केवळ चित्रपट न राहता आता ती लोकचळवळ बनल्याचे चित्र सोलापूरात दिसून येत आहे, असे मत प्रेक्षकांनी 'महाबातमी न्यूज पोर्टल' शी बोलताना व्यक्त केले. चित्रपटगृहांवर होणारी गर्दी शहरासह खेड्यातूनही गाड्या भरून चित्रपट पाहायला येणारा प्रेक्षक वर्ग यावरून याची साक्ष पटते.