शेठ लोणकरणजी चंडक स्मृती व्याख्यानमाला शुक्रवारपासून

नामवंत वक्त्यांची व्याख्याने ऐकण्याची संधी

शेठ लोणकरणजी चंडक स्मृती व्याख्यानमाला शुक्रवारपासून

सोलापूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र साहित्य परिषद सोलापूर शाखा आणि शेठ लोणकरणजी जगन्नाथजी चंडक ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शेठ लोणकरणजी चंडक स्मृती व्याख्यानमालेस शुक्रवार (ता.१७) पासून सुरुवात होत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही नामवंत वक्त्यांची व्याख्याने ऐकण्याची सुवर्णसंधी सोलापूरकरांना मिळणार आहे, अशी माहिती चंडक ट्रस्टचे विश्वस्त किशोर चंडक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शुक्रवार (ता.१७) ते रविवार (ता.१९) डिसेंबर या काळात दररोज सायंकाळी ६ वाजता हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या डॉ. वा. का. किर्लोस्कर सभागृहात ही व्याख्याने होणार आहेत. या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प शुक्रवारी (ता. १७) विजय कुवळेकर (पुणे) हे गुंफणार आहेत. 'माणसाच्या शोधात' असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. शनिवारी (ता.१८) डॉ. रामचंद्र देखणे (पुणे) हे 'महाकवी : कालिदास ते गदिमा' या विषयावर आपले चिंतन सोलापूरकरांसमोर मांडणार आहेत. तर रविवारी (ता. १९) व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प गुंफले जाणार आहे. यात सुनील शिनखेडे (सोलापूर) हे 'कवियत्री शांता शेळके यांच्या गीतांमधील भावसौंदर्य' या विषयावर व्याख्यान देणार आहेत.

व्याख्यानमाला दररोज सायंकाळी ठीक ६ वाजता सुरू होणार असून श्रोत्यांनी वेळेवर उपस्थित रहावे आणि व्याख्यानमालेचा आनंद घ्यावा, असे आवाहन किशोर चंडक यांनी केले.

व्याख्यानमालेला २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल किशोर चंडक यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्र साहित्य परिषदेकडून ऍड. जे जे. कुलकर्णी यांना आदर्श संघटक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात येणार आहे.

या पत्रकार परिषदेस महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष ॲड. जे. जे. कुलकर्णी, शेठ लोणकरणजी जगन्नाथजी चंडक ट्रस्टचे कार्यवाह डॉ. गिरीश चंडक, विश्वस्त किशोर चंडक, दत्ता सुरवसे, मारुती कटकधोंड, राजेंद्र भोसले आदी उपस्थित होते.