शिवचरित्र व्याख्याते डॉ. शिवरत्न शेटे यांना जाहीर झाला राष्ट्रीय पुरस्कार
महाराष्ट्रभरातून होतोय कौतुकाचा वर्षाव
सोलापूर : प्रतिनिधी
गीता परिवारातर्फे दरवर्षी दिला जाणारा स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्कार यंदा ख्यातनाम शिवचरित्र व्याख्याते डॉ. शिवरत्न शेटे यांना जाहीर करण्यात आल्याची माहिती गीता परिवाराचे कार्याध्यक्ष संजय मालपाणी यांनी दिली. राष्ट्रीय पातळीवरील हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल डॉ. शिवरत्न शेटे यांच्यावर महाराष्ट्रभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
राष्ट्र, धर्म, समाजासाठी जाणीव जागृतीचे उत्तुंग कार्य करणाऱ्या व्यक्तींना गीता परिवारातर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात येते. स्मृतिचिन्ह, मानपत्र, महावस्त्र आणि ७१ हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सोमवार, २३ सप्टेंबर रोजी दुपारी ४.३० वाजता जुनी मिल कंपाऊंड येथील नागेश करजगी ऑर्किड स्कूलमध्ये आयोजित छत्रपती शिवाजी महाराज कथा कार्यक्रमात गीता परिवाराचे संस्थापक अध्यक्ष प. पू. स्वामी गोविंद देव गिरिजी महाराज यांच्या हस्ते डॉ. शिवरत्न शेटे यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. शिवचरित्र व्याख्याते डॉ. शिवरत्न शेटे यांनी आजवर शेकडो व्याख्यानांच्या माध्यमातून समाजाला छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे चरित्र सांगितले आहे. तसेच दरवर्षी वर्षभरातून दोन वेळा गडकोट मोहिमा आयोजित करून हजारो शिवभक्तांना गडकोटांच्या सानिध्यात श्री शिवचरित्र समजावून सांगितले आहे. त्याचबरोबर 'चला संस्कार जपूया' या व्याख्यान मालिकेतून विशेषतः तरुणींसह संपूर्ण कुटुंब प्रबोधनासाठी महाराष्ट्रभर हजारो नागरिकांची जाणीवजागृती केली आहे. डॉ. शेटे यांच्या या कार्यासाठी त्यांचा पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे.
गीता परिवारातर्फे बालक आणि युवकांना श्रीमद् भगवद्गीता शिकवण्याचे काम करण्यात येते. केवळ कोविड काळापासून आजवर तब्बल १४२ देशांमधील ८ लाख जणांना गीता परिवारातर्फे ऑनलाईन माध्यमातून श्रीमद् भगवतगीता शिकवण्यात आली आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील बालक आणि युवकांनी गीता परिवाराच्या श्रीमद् भगवतगीता मार्गदर्शनात सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. मालपाणी यांनी केले आहे.