रायगडच्या इरशाळवाडीत झाला तब्बल 'इतके' मिमी पाऊस

बचाव कार्य युद्धपाळीवर

रायगडच्या इरशाळवाडीत झाला तब्बल 'इतके' मिमी पाऊस

सोलापूर : प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यातील खालापूर जवळील दुर्गम भागातील इरशाळगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या इरशाळवाडीवर बुधवारी रात्री दरड कोसळली. यात तब्बल १० नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेनंतर सर्व अडथळ्यांवर मात करीत मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. गेल्या ३ दिवसांत (दि. १७ जुलै ते १९ जुलै) तब्बल ४९९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढणे आणि त्यांच्यावर तातडीने उपचार करण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. तसेच बचावलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन व शासकीय यंत्रणा कार्यवाही करत असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गुरूवारी विधानसभेत निवेदनाद्वारे सांगितले.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, इरशाळवाडी ही उंच दुर्गम अशा डोंगरावर इरशाळगडाच्या पायथ्याशी वसलेली आहे. या ठिकाणी वाहने जाण्यासही रस्ता नाही. मौजे चौक मानिवली या गावातून पायी चालत जावे लागत आहे. या वाडीमध्ये ४८ कुटुंब वास्तव्यास असून लोकसंख्या २२८ इतकी आहे. 

बुधवारी रात्री १०.३० ते ११ दरम्यान ही दुर्दैवी घटना घडलेली आहे. इरशाळवाडीत ४८ कुटुंबांपैकी २५ ते २८ कुटुंबे बाधित झालेली आहेत. वाडीतील एकूण २२८ पैकी ७० नागरिक स्वत: घटनेच्या वेळीच सुरक्षित असल्याची प्राथमिक माहिती आहे. व २१ जण जखमी असून त्यांपैकी १७ लोकांवर तात्पुरत्या बेस कॅम्पमधे उपचार करण्यात आले आहेत. तर ६ लोकांना पनवेल येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचार दिले जात आहेत. सकाळी १०.१५ वाजेपर्यंतच्या अहवालानुसार १० लोकांचा मृत्यू झालेला आहे. उर्वरीत लोकांचा शोध व बचावकार्य सुरू आहे. त्या भागातील माती, दगड व तीव्र उतारावरून कोसळलेली दरडीचे स्वरूप पाहता व सतत पावसाच्या स्थितीमुळे चिखलपणा व ढिगारा घट्ट दबलेला असल्याने अतिशय दक्षतेने एनडीआरएफ च्या देखरेखीखाली स्थानिक गिर्यारोहक तरुण आणि एनडीआरफ जवान व सिडकोने पाठविलेले मजूर यांच्यामार्फत कार्यवाही सुरू आहे.

आज पहाटेपासून पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री गिरीश महाजन, उद्योग मंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) दादाजी भुसे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, मदत व पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील, स्थानिक आमदार महेश बाल्डी यांनी घटनास्थळी तातडीने पोहचून परिस्थितीची पाहणी केली.