भाऊ तोरसेकर, भूषणकुमार उपाध्यायांसह मान्यवर वक्त्यांच्या व्याख्यानांची मेजवानी
जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळातर्फे बौद्धिक व्याख्यानमाला
सोलापूर : प्रतिनिधी
जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाच्याहीवर्षी गणेशोत्सवानिमित्त बौद्धिक व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंडळाचे गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष लक्ष्मण सुतार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. १३ ते १६ सप्टेंबर दरम्यान दररोज सायंकाळी ७ वाजता हुतात्मा स्मृती मंदिरात ही व्याख्यानमाला होणार आहे. व्याख्यानमालेचे हे ४८ वे वर्ष आहे.
या व्याख्यानमालेचे उद्घाटन शुक्रवार १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता सोलापूरचे पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्या हस्ते हुतात्मा स्मृती मंदिरात होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे राहणार आहेत. पहिल्या दिवशी सिने कलावंत, अभिनेते सुबोध भावे यांची प्रकट मुलाखत निवेदिका मंजुषा गाडगीळ घेणार आहेत.
व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प शनिवार दिनांक १४ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर हे गुंफणार आहेत. 'विकसित भारताचे उद्दिष्ट आणि शिक्षणाची भूमिका' हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे.
ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर रविवार १५ सप्टेंबर रोजी व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प गुंफतील. 'कायदा, व्यवस्था आणि लोकशाही' या विषयावर ते सोलापूरकरांना मार्गदर्शन करणार आहेत. व्याख्यानमालेचा शेवट माजी पोलीस महासंचालक भूषणकुमार उपाध्याय यांच्या व्याख्यानाने होणार आहे. सोमवार १६ सप्टेंबर रोजी श्री. उपाध्याय ताणतणाव व मानसिक स्वास्थ्य या विषयावर व्याख्यान देणार आहेत.
जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळाच्या व्याख्यानमालेस गणेशभक्तांनी उपस्थित रहावे आणि मान्यवर वक्त्यांच्या व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण सुतार यांनी याप्रसंगी केले.
या पत्रकार परिषदेस सोलापूर जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे, उपाध्यक्ष ॲड. मिलिंद कुलकर्णी, तज्ञ संचालक ॲड. प्रदीपसिंह राजपूत, संचालक जगदीश भुतडा, पुरुषोत्तम उडता, आनंद कुलकर्णी, डॉ. अजितकुमार देशपांडे, संचालिका चंद्रिका चौहान, बोर्ड ऑफ मॅनेजमेंट सदस्य डॉ. अजितकुमार देशपांडे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुकुंद कुलकर्णी, सरव्यवस्थापक प्रदीप बुट्टे, उपसरव्यवस्थापक अंजली कुलकर्णी, सहाय्यक सरव्यवस्थापक देवदत्त पटवर्धन, मकरंद जोशी, कर्ज विभाग प्रमुख आनंद ताशी, जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण सुतार, उपाध्यक्षा प्रीती चौहान, सचिव नामदेव यलगोंडा, खजिनदार सुहास कमलापुरकर, व्याख्यानमाला समिती प्रमुख मदन मोरे तसेच मंडळाचे विश्वस्त व पदाधिकारी उपस्थित होते.