करण म्हेत्रे, अंत्ययात्रा आणि फटाक्यांची माळ....!
सुमारे १०० घरांना लागले कुलूप

पुरुषोत्तम कारकल
सामाजिक कार्यकर्ते करण म्हेत्रे यांचे १५ मे रोजी निधन झाले. त्यांच्यावर १६ मे रोजी दुपारी अंत्यसंस्कारही करण्यात आले. मात्र त्यांचे निधन आणि आजवर घडलेल्या घटनाक्रमाने शहरातील सामाजिक वातावरण पार बिघडून गेले आहे. शासकीय कारभार आणि समाजाची गरज यांच्यात असलेले कोसोंचे अंतर पोलिसांच्या 'सद्रक्षणाय....' या ब्रीदवाक्यालाच हरताळ फासणारे ठरत आहे, अशी भावना समाजात उत्पन्न झाली आहे.
करण म्हेत्रे हे शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या कामगार वस्त्यांमधील प्रचंड लोकप्रिय नाव. विशेषतः मोची समाजात त्यांना मानणाऱ्या युवकांची संख्या हजारोंच्या घरात आहे. त्यामुळे लॉकडाऊनचे निर्बंध तोडून हजारोंचा जमाव अंत्ययात्रेला जमा झाला होता.
सध्या कोरोना महामारीमुळे उदभवलेली अत्यंत वाईट स्थिती पाहता ही गर्दी प्रत्येक सोलापूरकराच्या हृदयात धडकी भरवणारी होती.
अंत्ययात्रेला हजारोंनी लोक आल्यानंतर शहरात एकच चर्चा सुरू झाली. मात्र इतकी गर्दी कशी झाली ? याला जबाबदार कोण ? या प्रश्नांची उत्तरे न शोधता शासकीय यंत्रणेने सर्वसामान्य मजूर, कामगार असलेल्या नागरिकांना वेठीस धरण्याचे धोरण अवलंबल्याचे दिसले.
१५ मे रोजी रात्री एक घटना मौलाली चौक ते सिद्धार्थ चौक दरम्यान करण म्हेत्रे यांचे संपर्क कार्यालय आहे तिथे घडली. करण म्हेत्रे यांच्या निधनाच्या धक्क्यात तेथील नागरिक असतानाच रिक्षातून आलेल्या काही टवाळखोर युवकांनी फटाक्यांची माळ इथे उडवून पलायन केले. तिथल्या नागरिकांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला खरा, पण अंधाराचा फायदा घेऊन ते निसटले. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली, असे येथील नागरिकांनी सांगितले. याठिकाणी एमआयएम आणि काँग्रेस कार्यकर्त्यांत पूर्वीपासूनच धुसफूस सुरू असते. यापूर्वीही भांडणे, हाणामारी येथे अनेकदा झाली आहे. अशा परिस्थितीत या घटनेची सत्यता तपासून पोलिसांनी वेळीच या समाजकंटकांना ताब्यात घेणे आवश्यक होते. मात्र पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.
ही घटना घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी मोठी गर्दी होणार याचा अंदाज पोलिसांना आला नाही का ? पोलिसांनी जर सकाळीच मोठा बंदोबस्त परिसरात लावला असता तर इतकी गर्दीच झाली नसती. परंतु तेंव्हा येथील संभाव्य गर्दीकडे दुर्लक्ष करणारे पोलिस गर्दी गोळा झाल्यानंतर मात्र जागे झाले. गर्दीमुळे सर्वत्र ओरड सुरू झाल्यानंतर मलमपट्टी करण्यासाठी दिसेल त्याला पकडण्याची मोहीम पोलिसांनी चालवली.
घरात बसलेले युवक, दळण आणायला गेलेला तरुण, बिगारी कामावरून घरी परतणारे मजूर इतकेच काय तर सार्वजनिक शौचालयाकडे निघालेल्या युवकांनाही पोलिसांनी बळजबरीने गाडीत कोंबल्याचे नागरिक सांगत आहेत.
जे लोक अंत्ययात्रेसाठी जमले होते त्यातील अनेकजण फरार झाले. आणि दुसरीकडे पोलिसांनी निष्पाप नागरिकांना त्रास देणे सुरू केल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. या कारवाईला घाबरून सुमारे १०० कुटुंबे अक्षरशः घराला कुलूप लावून दुसरीकडे जाऊन राहत आहेत.
सर्व परिसर सील केल्यामुळे गेल्या तीन ते चार दिवसांपासून भाजी, दूध, किराणा माल मिळणेही येथील नागरिकांना अवघड झाले आहे. येथील नागरिक भीतीच्या छायेखाली जगत आहेत.
करण म्हेत्रे यांचा आजवरचा सामाजिक, राजकीय प्रवास पाहता त्यांच्या अंत्ययात्रेला हजारो लोक गर्दी करणार हे पोलिसांच्या लक्षात आले नाही ? तशातच फटाके टाकण्याची घटना घडल्यानंतर पोलिसांनी वेळीच सावध होऊन बंदोबस्त लावणे गरजेचे नव्हते का ? करण म्हेत्रे समर्थक काँग्रेस कार्यकर्ते आणि एमआयएम कार्यकर्ते यांच्यातील संघर्ष पोलिसांना नवा नाही. अशावेळी अप्रिय घटना घडून शहराची शांतता, कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊ नये यासाठी वेळीच पावले उचलण्याची आवश्यकता होती. मात्र गर्दी झाल्यानंतर कोरोनाचा प्रसार वाढण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर काही तरी कारवाई केली असे दाखवण्यासाठी पोलिसांनी निष्पाप नागरिकांना त्रास देऊ नये अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत.
कोरोनाच्या या काळात अंत्ययात्रेला झालेल्या या गर्दीचे समर्थन कोणीच करू नये. मात्र बहुतांश अशिक्षित, कामगार वर्ग असलेल्या समाजातील लोकप्रिय नेत्याच्या अंत्ययात्रेला गर्दी होऊ शकते हे साधे गणित पोलिस यंत्रणेत कोणाच्याच कसे लक्षात आले नाही ? आणि आता सर्वसामान्य नागरिकांना होत असलेल्या प्रचंड त्रासाला जबाबदार कोण ?