'सतनाम वाहेगुरू सतनाम' च्या जयघोषात श्री गुरुनानकदेव जयंती उत्साहात
श्री गुरुग्रंथसाहिब चे भक्तीभावात पठण
सोलापूर : प्रतिनिधी
'सतनाम वाहेगुरु सतनाम' च्या जयघोषात श्री गुरुनानकदेव यांची ५५३ वी जयंती सोलापूर शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. श्री गुरुनानकदेव जयंती निमित्त अमृतवेला ट्रस्टतर्फे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
गुरुप्रीतसिंग रिंकू भाईसाबजी यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी पहाटे ४.३० वाजता धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ झाला. पहाटे ४.३० ते सकाळी ६.३० वाजेपर्यंत गुरुप्रीतसिंग रिंकू भाईसाबजी यांचा लाईव्ह किर्तन दरबार साई गार्डन सेंटर, नवजीवन नगर सेंटर आणि गुरुनानक दरबार सेंटर येथे झाला. यानंतर सकाळी ६.३० वाजता नवजीवन नगरातून श्री गुरुग्रंथसाहीब ची पालखी मिरवणूक काढण्यात आली. सजवलेल्या पालखीत श्री गुरुग्रंथसाहीब हा धार्मिक ग्रंथ ठेवण्यात आला होता. यावेळी 'नानक नाम चढदी कला तेरे भाने सरबत दा भला' चा जप करण्यात येत होता. या पालखी मिरवणुकीत आबालवृद्ध सहभागी झाले होते. नवजीवन नगरातून निघालेली ही मिरवणूक उजनी कॉलनी परिसर, गुरुनानक नगरमार्गे नवजीवन नगर येथे विसर्जित झाली.
यानंतर सायंकाळी साई गार्डन सेंटरतर्फे 'श्री सुखमणीसाहीबजी' या धार्मिक ग्रंथांचा पाठ आणि एक हजार भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. तसेच गुरुनानक दरबार येथे 'श्री गुरुग्रंथसाहीबजी' ग्रंथ पारायणाची समाप्ती आणि महाप्रसाद वाटप करण्यात आला. रात्री झालेल्या गुरुप्रीतसिंग रिंकू भाईसाबजी यांच्या लाईव्ह कीर्तन दरबाराने श्री गुरुनानकदेव जयंतीच्या उत्सवाची सांगता झाली.
याप्रसंगी अमृतवेला ट्रस्टच्या साई गार्डन सेंटरचे हरिष कुकरेजा, जगदीश खानचंदानी, विकी वलेचा, मुकेश हिरानंदानी, करण कुकरेजा, नंदू परचानी, राम संतांनी, चंदन रामचंदानी, नवजीवन नगर सेंटरचे राजू धामेचा, योगेश रावलानी, गुरुनानक दरबार सेंटरचे इंदरलाल होतवानी, गागनदास कुकरेजा, मोहन सचदेव, शंकर होतवानी, लालचंद वाधवानी, धनराज आनंदानी, नारायण आनंदानी, जेठानंद भेरवानी आदी उपस्थित होते.