लोकसभा निवडणुकीत सोलापूरकरांचा कौल कोणाला मिळाला ?
'महाबातमी न्यूज पोर्टल' चा सर्व्हे आला समोर
सोलापूर : प्रतिनिधी
अत्यंत चुरशीच्या झालेल्या सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीनंतर ही निवडणूक कोण जिंकणार याबाबतचे सर्वेक्षण 'महाबातमी न्यूज पोर्टल' ने केले. या सर्व्हेतून भाजपा आणि महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांना ६८.५ टक्के मते तर काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना ३१ टक्के मते मिळाली आहेत. यावरून सोलापूरकरांचा कौल भाजप आणि महायुतीला असल्याचे दिसून येत आहे.
२०१४ आणि २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने काँग्रेसचा पराभव करीत विजय मिळवला होता. परंतु तत्कालीन खासदार ॲड. शरद बनसोडे आणि खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी हे सोलापूरचा विकास करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करीत काँग्रेसने भाजपाला पराभूत करण्यासाठी मोठी मोहीम उघडली होती. काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे दौरे करीत सहाही विधानसभा मतदारसंघात जोरदार प्रचार केला. याशिवाय राम सातपुते हे स्थानिक नसून उपरे उमेदवार आहेत. त्यामुळे सोलापूरकरांनी प्रणिती शिंदे यांनाच निवडून द्यावे असे आवाहन करुन काँग्रेस आणि महाविकास आघाडीने प्रचाराची रणनीती आखली होती. दुसरीकडे सोलापूर जिल्हा आणि परिसरात झालेले राष्ट्रीय महामार्ग, मोदी सरकारने जलजीवन मिशनच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्यासाठी केलेले प्रयत्न, स्मार्ट सिटी तसेच राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र धोरण, सांस्कृतिक राष्ट्रवाद, विकसित होत जाणारी भारतीय अर्थव्यवस्था आदी मुद्द्यांवर मोदी सरकारने केलेल्या कामांवर मतदारांकडून मते मागितली.
भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रस्ते वाहतूक विकास मंत्री नितीन गडकरी, उत्तर प्रदेशचे फायरब्रँड मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तेलंगण येथील आमदार राजासिंह ठाकूर यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांच्या सभा घेऊन जोरदार प्रचार केला. काँग्रेस आणि महाविकास आघाडीने काँग्रेसचे नेते राहुल गांधी, माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह अनेक सभा घेऊन भाजपवर प्रहार केले.
सत्ताधारी आणि विरोधकांनी केलेल्या प्रचारानंतर सोलापूरकरांनी रांगा लावून चुरशीने मतदान केले. परिणामी, मागील लोकसभा निवडणुकीपेक्षा यंदा ०.७५ टक्के मतदान वाढले आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल काय लागणार याबाबत आता कट्ट्यांवर, चावड्यांवर चर्चा सुरु आहेत. मतपेटीत झालेले एकूण मतदान कोणाच्या बाजूने झाले आहे हे ४ जून लाच कळणार आहे.