भाजपातील देशमुख गटाने पक्षातील विरोधकांना दिले ' उत्तर '

भाजपात सुरू झाले 'पोस्टर वॉर'....कसे ? वाचा !

भाजपातील देशमुख गटाने पक्षातील विरोधकांना दिले ' उत्तर '

सोलापूर : प्रतिनिधी

येत्या विधानसभा निवडणुकीत शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात भाजप विरोधकांऐवजी भाजपअंतर्गतच मुख्य लढत होण्याची चिन्हे दिसत आहेत. आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात लावलेल्या बॅनरला उत्तर म्हणून आमदार विजयकुमार देशमुख समर्थकांनी सोशल मीडियावर पोस्टर प्रसिद्ध करून त्याला उत्तर दिले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार विजयकुमार देशमुख यांच्या स्वपक्षातील अनेक नेत्या - कार्यकर्त्यांनी त्यांना खुले आव्हान देण्यासाठी शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात ठिकठिकाणी भाजपाचे ज्येष्ठ नेते चन्नवीर चिट्टे यांचे छायाचित्र आणि विधिमंडळाची प्रतिमा असलेले बॅनर लावले आहेत. त्यावर 'आमचं ठरलंय, शहर उत्तर विधानसभा' असं मजकूर लिहिण्यात आला आहे. शहरभर हे बॅनर झळकताच भाजपसह सर्वपक्षीय कार्यकर्त्यांमध्ये एकच खळबळ उडाली. या बॅनरमुळे अस्वस्थ झालेल्या आमदार विजयकुमार देशमुख समर्थकांनीही तोडीस तोड उत्तर म्हणून सोशल मीडियावर पोस्टर शेअर केले आहे. 'सोलापूर शहर उत्तर मतदारांनी ठरवलंय, विजय मालकांचा विजय, पाचव्यांदा निश्चित केलाय' असा मजकूर असलेले पोस्टर आमदार विजयकुमार देशमुख गटाच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. हे पोस्टर देखील मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.

शहरात लावलेल्या बॅनरला उत्तर म्हणून संपूर्ण विधानसभा क्षेत्रात आपलीच ' मालकी ' सिद्ध करण्यासाठी आमदार विजयकुमार देशमुख समर्थकांनी शहर उत्तर विधानसभेत सर्वत्र बॅनर लावण्याची तयारी सुरू केली होती. मात्र काही नेत्यांच्या सांगण्यावरून हा बेत रद्द करण्यात आल्याचे कळते.

विधानसभा निवडणुक सुरू होण्यास काहीसा अवधी असला तरी इतर विधानसभा मतदारसंघांच्या तुलनेत शहर उत्तर विधानसभेत विधानसभा निवडणुकीची रंगत आतापासूनच पाहायला मिळत आहे.