'शहर उत्तर' मध्ये फुटला 'राजकीय बॉम्ब'

आमदार विजयकुमार देशमुखांच्या अडचणीत वाढ : 'आमचं ठरलंय शहर उत्तर विधानसभा' बॅनर ने खळबळ

'शहर उत्तर' मध्ये फुटला 'राजकीय बॉम्ब'

सोलापूर : प्रतिनिधी

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागलेल्या भाजपमध्ये शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात 'राजकीय बॉम्ब' फुटला आहे. त्याला कारण आहे शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात झळकलेले बॅनर.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते चन्नवीर चिट्टे यांचे छायाचित्र आणि विधान मंडळाची प्रतिमा असलेले 'आमचं ठरलंय शहर उत्तर विधानसभा' असे बॅनर शहर उत्तर मध्ये झळकले आणि चर्चा सुरू झाली ती भाजपच्या उमेदवारीची.

गेल्या २० वर्षांपासून माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख शहर उत्तर विधानसभेचे भाजपचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व करत आहेत. मात्र त्यांच्या विधानसभेची मुदत जशी जशी संपत आहे तसा तसा आमदार विजयकुमार देशमुख यांना पक्षातूनच विरोध मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.

शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते चन्नवीर चिट्टे यांना उमेदवारी मिळावी यासाठी त्यांच्या समर्थकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्याकरिता संपूर्ण शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात 'आमचं ठरलंय शहर उत्तर विधानसभा' असे बॅनर लावण्यात आले आहेत. त्यामुळे भाजपसह विविध पक्षातील नेते, कार्यकर्ते, नागरिकांमध्ये एकच चर्चा सुरू झाली आहे.

शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात आणि भाजपात आमदार विजयकुमार देशमुख यांचेच वर्चस्व असल्याची बतावणी आमदार देशमुख यांचे समर्थक नेते आणि कार्यकर्ते करीत असले तरी सत्य परिस्थिती तशी नसल्याचे दिसून येते. याचे कारण यंदाच्या विधानसभा निवडणुकीत आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात भूमिका घेऊन त्यांच्या नावाला कडाडून विरोध करण्यासाठी भाजपामधीलच काही जेष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत.

आगामी निवडणुकीत आमदार विजयकुमार देशमुख यांना तिकीट न देता चन्नवीर चिट्टे यांना तिकीट द्यावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. गेल्या तब्बल २० वर्षांपासून एकाच व्यक्तीला दिलेली उमेदवारी, आमदार विजयकुमार देशमुख यांचे मोजके निकटवर्तीय सोडले तर कोणालाही विश्वासात न घेता एकांगी चालणारा कारभार, भाजपातील पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांना डावलून इतर पक्षातील नेत्यांना, कार्यकर्त्यांना आर्थिक, सामाजिकदृष्ट्या सक्षम करण्याची आमदार विजयकुमार देशमुख यांची भूमिका, अनेक महत्त्वाची पदे आपल्याच घरात ठेवून कार्यकर्त्यांवर केला जाणारा अन्याय अशा अनेक मुद्द्यांवर आरोप करीत भाजपातील नेते आणि कार्यकर्ते प्रचंड संतप्त झाले आहेत. या संतापाचा कडेलोट आगामी विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळण्याची चिन्हे आहेत.

शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आगामी विधानसभा निवडणुकीत काय भूमिका राहणार ? यावर आमदार विजयकुमार देशमुख यांचे राजकीय भवितव्य ठरणार हे निश्चित.

(भाग १)