छत्रपती शिवरायांनी घेतलेली शपथ होती हिंदुराष्ट्राची
प. पू. स्वामी गोविंद देव गिरिजी : छत्रपती श्री शिवाजी महाराज कथेस प्रचंड प्रतिसाद
सोलापूर : प्रतिनिधी
मुघलांच्या जुलमी अत्याचाराने ग्रासलेल्या भारताला छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी मुक्त केले. छत्रपती शिवरायांनी घेतलेली शपथ हिंदू साम्राज्याची म्हणजेच हिंदुराष्ट्राची होती, असे प्रतिपादन छत्रपती श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र अयोध्याचे कोषाध्यक्ष प. पू. स्वामी गोविंद देव गिरिजी यांनी केले.
३५० व्या श्री शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त समस्त हिंदू समाजातर्फे जुनी मिल कंपाउंड येथील नागेश करजगी ऑर्किड स्कूलमध्ये आयोजित शिवाजी महाराज कथेच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी प. पू. स्वामी गोविंद देव गिरिजी यांनी मार्गदर्शन केले. 'शिवसंस्कार' या विषयावर बोलताना त्यांनी छत्रपती श्री शिवरायांचे बालपण, स्वराज्याची शपथ आणि त्या काळातील संतकार्य आदींवर विवेचन केले.
प. पू. स्वामी गोविंद देव गिरिजी म्हणाले, छत्रपती श्री शिवरायांच्या सर्वोत्तम गुरु असलेल्या त्यांच्या मातोश्री जिजामातांनी त्यांना घोडेस्वारी, राजनीतीशास्त्र, संस्कृत, व्यायाम, तलवारबाजी, दांडपट्टा, रामायण, महाभारत, व्यवस्थापनाचे धडे शिकवले. अत्याचाराचा नाश करणाऱ्या धर्माधिष्ठित राजा असावा या भूमिकेतून जिजामातांनी त्यांना घडवले. माझ्या पोटी छत्रपती श्री शिवाजी महाराज जन्मावेत असे भारतातील प्रत्येक स्त्रीला वाटले तर देशाचे भाग्य पालटेल. हिंदुस्थानसाठी सर्वांत मोठी प्रेरणा छत्रपती श्री शिवरायच आहेत.
छत्रपती श्री शिवरायांच्या समकालीन असलेले जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांनी समाजाची जागृती केली. हिंदवी स्वराज्यासाठीच्या संघर्षात योगदान देण्याची जनभावना त्याकाळात तयार होत गेली. आज घराचे उज्वल भविष्य आपल्याला घडवायचे असेल तर प्रत्येक घरात श्री शिवछत्रपतींची प्रतिमा लागली पाहिजे.
याप्रसंगी सिनेकलावंत आमीर तडवळकर यांच्या समर्पित नाट्यशाळेच्या कलाकारांनी छत्रपती श्री शिवरायांनी घेतलेली 'हिंदवी स्वराज्याची शपथ' हा प्रसंग नाट्यरूपातून उत्कृष्टरित्या सादर केला. यावेळी उपस्थितांनी प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात बालकलाकारांचे कौतुक केले.
महर्षी वेदव्यास प्रतिष्ठानची माहिती आणि प्रास्ताविक सी. ए. राजगोपाल मिणीयार यांनी केले. तर गुरुशांत धुत्तरगावकर यांनी सूत्रसंचालन केले.
----------
आज ' शिवप्रताप ' या विषयावर मार्गदर्शन अन् प्रसंग सादरीकरण
छत्रपती श्री शिवाजी महाराज कथेमध्ये शनिवारी प. पू. स्वामी गोविंद देव गिरिजी ' शिवप्रताप ' या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी प्रसंग सादरीकरणदेखील होणार आहे. सोलापूरकरांनी या कथेस उपस्थित राहुन लाभ घ्यावा, असे आवाहन समस्त हिंदू समाजातर्फे करण्यात आले आहे.
---------