स्वदेशी... योग अन् आयुर्वेदाचा झाला जागर
संस्कार भारतीने दिला सामाजिक संदेश : अक्षता सोहळ्यासाठी नंदीध्वज मिरवणुकांना प्रारंभ
सोलापूर : प्रतिनिधी
रंगावलीतून स्वदेशी, योग अन् आयुर्वेदाचा जागर सोलापुरात झाला. निमित्त होते ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यात्रेतील अक्षता सोहळ्यासाठी निघालेल्या मिरवणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कार भारतीतर्फे साकारलेल्या रांगोळ्यांच्या पायघड्यांचे. ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेनिमित्त निघणाऱ्या अक्षता सोहळ्याच्या मिरवणूकीला नुकताच प्रारंभ झाला. हिरेहब्बू वाड्यामध्ये नंदीध्वजांची पूजा करून मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली. अवघ्या काही तासातच सर्व नंदीध्वज श्री सिद्धरामेश्वर मंदिरात अक्षता सोहळ्यासाठी पोहोचणार आहेत.
मिरवणुकीच्या अग्रभागी पंचरंगी ध्वज आहे. यामागे भगवा ध्वज, सजवलेली बैलगाडी, हलगी पथक, पालखी, वाद्यवृंद आहे. तसेच मानकरी हिरेहब्बू श्री सिद्धरामेश्वरांच्या योगदंडासह पारंपारिक वेशात चालत आहेत. नंदीध्वज मिरवणूक मार्गावर नागरिकांनी नंदीध्वजाच्या पूजनासाठी मोठी गर्दी केली आहे.
नंदीध्वज मिरवणूक दाते गणपती जवळ येताच दाते पंचांगचे मोहन दाते यांनी श्री सिद्धरामेश्वर यांच्या पालखी पंचांग ठेवून पूजन केले. मिरवणूक मार्गावर भाविकांकडून नंदीध्वजांचे पूजन केले जात आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कार भारतीकडून हिरेहब्बू वाड्यापासून श्री सिद्धरामेश्वर मंदिरापर्यंत तीन किलोमीटर आकर्षक रांगोळीच्या पायघड्या अंथरण्यात आल्या आहेत. दत्त चौकात संस्कार भारतीकडून स्वदेशी संकल्पनेवर आधारित रांगोळीच्या पायघड्या अंथरण्यात आल्या आहेत. आयुर्वेद, भारतीय गुरुकुल पद्धती, महाकुंभ, सोलापुरी चादर, एकत्र कुटुंब पद्धती, योग, भारतीय संगीत, नववर्षाचा शुभारंभ गुढीपाडवा, भारतीय संस्कृती अशा अनेक विषयांवरील रांगोळीचे गालीचे काढण्यात आले आहेत.
संस्कार भारतीचे शहर अध्यक्ष डॉ. इरेश स्वामी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कार भारतीचे केंद्रीय प्रमुख रघुराज देशपांडे, पश्चिम महाराष्ट्र रंगवली प्रमुख संगीता भांबुरे, शहर प्रमुख ममता अवस्थी, सचिव अनंत देशपांडे, बाळकृष्ण वल्लाल, सचिन वेणेगुरकर, सीमा मनगोळे, किरण आवटे, स्वाती म्हमाणे, किरण तंबाके, पल्लवी महामुनी, दीपा उलेकर, विनायक बोड्डू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उत्कृष्ट नियोजन केले आहे.
सातही नंदीध्वज पारंपारिक मार्गाने ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरात पोहोचल्यानंतर काही वेळातच अक्षता सोहळ्यास प्रारंभ होणार आहे.