गड्डा यात्रेत यंदा पहा एक कोटी रुपयांचा रेडा
तब्बल दीड टन आहे वजन : एक फूट लांबीची मिरचीही ठरणार आकर्षण
सोलापूर : प्रतिनिधी
तब्बल ८०० वर्षांची परंपरा असलेल्या ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांच्या गड्डा यात्रेत यंदाच्यावर्षी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात तब्बल एक कोटी रुपये किंमत असलेला गजेंद्र नावाचा रेडा नागरिकांना पाहायला मिळणार आहे. या रेड्याचे वजन तब्बल दीड टन इतके आहे.
गड्डा यात्रेत दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री सिद्धेश्वर देवस्थानच्यावतीने श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शन भरविण्यात येणार असून यंदाचे ५२ वे वर्ष आहे.
यावर्षी २९ डिसेंबर ते २ जानेवारी या कालावधीत होम मैदानावर हे राज्यस्तरीय प्रदर्शन होणार आहे, अशी माहिती श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कृषी विभाग, आत्मा जिल्हा परिषद सोलापूर हे या प्रदर्शनाचे सहप्रयोजक असून कृषी संशोधन केंद्र, सोलापूर डाळिंब संशोधन केंद्र, रब्बी ज्वारी संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, रेशीम - खादी ग्रामोद्योग, पशुसंवर्धन विभाग, सामाजिक वनीकरण, राष्ट्रीयकृत बँका, नाबार्ड, कृषी महाविद्यालय, कृषी स्टार्टअप, उद्योजक, नवउद्योजक, कृषी यांत्रिकीकरण करणारे, फळ रोपवाटिकाधारक, साखर कारखाने यांच्या सहभागाने हे प्रदर्शन होणार आहे.
या प्रदर्शनात एकूण ३०० स्टॉल असून यात २०० हून अधिक शेतीविषयक कंपन्यांचा सहभाग राहणार आहे. यामध्ये ट्रॅक्टर व शेती अवजारे, वाहन महोत्सव, शेती विषयक प्रक्रिया उद्योग, शासनाच्या कृषी विभागाच्या योजनांची माहिती देणारे दालन, सेंद्रिय शेतीचे विशेष दालन, पशुपक्षी प्रदर्शन, दुर्मिळ देशी ५०० हून अधिक बियाणांचे प्रदर्शन व विक्री, तांदूळ महोत्सव, परदेशी भाजीपाला प्रदर्शन, शेती विषयक पुस्तक प्रदर्शन, कृषी स्टार्टअप उद्योजक माहिती देणारे दालन अशी दालने असणार आहेत.
यात्रेचे आकर्षण असलेला कर्नाटकातील मुंगसुळी या गावातील विलास नाईक यांच्या मालकीचा दीड टन वजनाचा हा गजेंद्र नावाचा रेडा नागरिकांना पाहण्यासाठी ठेवण्यात येणार आहे.
३० डिसेंबर रोजी सकाळी ११ ते ४ या वेळेत डॉग शो होणार असून यात २०० हून अधिक श्वान सहभागी होणार आहेत. तर ३१ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते ४ या वेळेत कॅट शो होणार असून यात १०० पेक्षा अधिक मांजरे सहभागी होतील. तसेच ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत होम मिनिस्टर - खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. होम मिनिस्टर फेम क्रांती माळेगावकर याचे सूत्रसंचालन करणार आहेत.
या प्रदर्शनास सुमारे दोन लाख जण भेट देतील असा अंदाज असल्याचे श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी सांगितले. यावेळी श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. या पत्रकार परिषदेस यात्रा कमिटीचे अध्यक्ष सिद्धेश्वर बमणी, कृषी उपसंचालक राजकुमार मोरे, कृषी प्रदर्शन समिती अध्यक्ष गुरुराज माळगे, नीलकंठ कोनापुरे, विजयकुमार बरबडे, चंद्रकांत मंगरुळे, बाळासाहेब भोगडे, विश्वनाथ लब्बा, आप्पासाहेब कळके, ॲड. आर. एस. पाटील, स्मार्ट एक्स्पोचे संचालक सोमनाथ शेटे आदी उपस्थित होते.
-------
जगातील सर्वात लांब एक फूट लांबीची देशी मिरची
या प्रदर्शनात जगातील सर्वात लांब एक फूट लांबीची देशी मिरची नागरिकांना पाहायला मिळणार आहे. तसेच जगातील सर्वात लांब १५ इंच लांबीची गव्हाची लोंबी, गोड्या पाण्यात मोत्यांची शेती संदर्भातील माहितीही मिळणार आहे. याशिवाय गाई, म्हैस व बैल यांचे प्रदर्शनही येथे भरण्यात येणार आहे.