दोन्ही किडनी अन् डोळ्यांचे केले दान
कुंभारी येथील अश्विनी रुग्णालयात झाली शस्त्रक्रिया
सोलापूर : प्रतिनिधी
मेंदूमृत झालेल्या महिलेच्या दोन्ही किडनी आणि डोळे दान करून कुटुंबीयांनी समाजासमोर नवा आदर्श ठेवला. कुंभारी येथील अश्विनी मेडिकल कॉलेज हॉस्पिटल व रिसर्च सेंटर येथे ही शस्त्रक्रिया करण्यात आली.
अश्विनी रुग्णालयात बुधवारी एका मेंदू मृत महिलेस दाखल करण्यात आले होते. यानंतर कुटुंबियांनी रुग्णाचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गुरुवारी या मेंदू मृत महिलेवर शस्त्रक्रिया करून त्यांच्या दोन्ही किडन्या व डोळे काढण्यात आले. त्यापैकी एक किडनी पुणे येथील रुबी हॉस्पिटलचे डॉ. मनोज श्रीवास्तव यांनी शस्त्रक्रिया करून ग्रीन कॅरिडॉरद्वारे पुणे येथील रुग्णासाठी नेली. तर दुसरी किडनी कुंभारी येथील अश्विनी हॉस्पिटलमधील रुग्णास प्रत्यारोपित करण्यात आली. किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया डॉ. हेमंत देशपांडे, डॉ. विठ्ठल कृष्णा, डॉ. संदीप होळकर, डॉ. मयुर मस्तुद, डॉ. देढीया, डॉ. सुषमा संभारंभ, डॉ. निलेश मिसाळ, डॉ. अनुज ताटेवार, डॉ. पूजा देशमुख, डॉ. राहुल राठोड, डॉ. आदित्य डोरकर यांनी यशस्वी केली. या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयातील नर्सिंग स्टाफ चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.
मेंदू मृत महिलेचे पती, मुलगा आणि भाऊ यांनी कठीणवेळी सामाजिक बांधिलकी ठेवून रुग्णाच्या दोन्ही किडन्या आणि दोन्ही डोळे असे पवित्र अवयव दान करून समाजाला आदर्श घालून दिला आहे, असे कार्यकारी विश्वस्त बिपिनभाई पटेल यावेळी म्हणाले.
ही शस्त्रक्रिया व किडनी प्रत्यारोपण प्रक्रिया यशस्वी केल्याबद्दल कार्यकारी विश्वस्त बिपिनभाई पटेल, विश्वस्त भारतीबेन पटेल, मेहुल पटेल, अधिष्ठाता डॉ. सुहास कुलकर्णी, उप अधिष्ठाता डॉ. सचिन मुंबरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ गुणवंत नस्के, आरोग्य अधीक्षक डॉ. सिद्धेश्वर करजखेडे यांनी सर्वांचे अभिनंदन केले.