पावसाकरिता ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांना साकडे

कोणी केली महाआरती ? वाचा !

पावसाकरिता ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांना साकडे

सोलापूर : प्रतिनिधी

राज्यातील दुष्काळ सदृश्य परिस्थिती संपावी, सर्वदूर समाधानकारक पाऊस व्हावा याकरिता सहकारमहर्षी गणपतराव साठे फाउंडेशनकडून तिसऱ्या श्रावण सोमवारी ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांची महाआरती करण्यात आली. याप्रसंगी तिसऱ्या श्रावण सोमवारनिमित्त तीन हजार ३३३ भाविकांना बेलपत्र आणि प्रसादाचे वाटपही करण्यात आले.

श्री सद्गुरु बसवारूढ महास्वामीजी मठाचे उत्तराधिकारी पू. श्री. शिवपुत्र महास्वामीजी यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे, सहकारमहर्षी गणपतराव साठे फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रियदर्शन साठे, आनंद मुस्तारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

महाआरतीनंतर ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांच्या दर्शनास येणाऱ्या हजार भाविकांना बेलपत्र, फुले आणि प्रसादाचे वाटप करण्यात आले. पू. श्री. शिवपुत्र महास्वामीजी म्हणाले, राज्यात पाऊस नसल्याने दुष्काळ सदृश्य परिस्थिती उद्भवली आहे. शेतकरी संकटात आहेत. भविष्यात पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. अशावेळी सहकार महर्षी गणपतराव साठे फाउंडेशनने 'वसुधैव कुटुंबकम' या उक्तीप्रमाणे संपूर्ण समाजाच्या कल्याणासाठी महाआरतीचा राबविलेला उपक्रम कौतुकास्पद आहे.

शिवसेनेचे राज्य प्रवक्त्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे म्हणाल्या, राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्रंदिवस प्रयत्न करीत आहेत. अशावेळी पाऊस नसल्यामुळे राज्यातील शेतकरी, नागरिक हवालदील झाले आहेत. त्यामुळे राज्यात भरपूर पाऊस पडू दे आणि राज्यातील सर्व नद्या, नाले तुडुंब भरून वाहू दे अशी प्रार्थना या महाआरतीच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

याप्रसंगी भीम वाघमारे, प्रद्युम्न वाघमारे, अभिषेक वाघमारे, गणेश तूपडोळे, अनिता तुपडोळे, प्रेरणा गवळी आदी उपस्थित होते.