भाजपच्या शहर अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर काय म्हणाले नरेंद्र काळे ?

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर असेल 'ही' भूमिका

भाजपच्या शहर अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर काय म्हणाले नरेंद्र काळे ?

सोलापूर : प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टीच्या शहर अध्यक्षपदी सोलापूर महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते नरेंद्र काळे यांची निवड करण्यात आली. भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी ही निवड जाहीर केली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेले नरेंद्र काळे यांची पक्षनिष्ठ कार्यकर्ता अशी प्रारंभीपासून प्रतिमा राहिलेली आहे. २००० साली सामाजिक कार्यात सक्रिय झालेल्या नरेंद्र काळे यांनी बजरंग दलाचे शहर सहसंयोजक, शहर संयोजक, जिल्हा संयोजक, प्रांत सहसंयोजक, धर्मजागरण जिल्हा संयोजक अशा विविध जबाबदाऱ्यांवर काम केले आहे. २०१२ साली भाजपात प्रवेश केलेल्या नरेंद्र काळे यांनी पदार्पणातच महापालिका निवडणुकीत यश मिळवले. २०१६ - १७ साली त्यांनी सोलापूर महानगरपालिकेचे विरोधीपक्षनेता म्हणून ही काम केले. प्रदेश भाजपाच्या ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्षपद त्यांच्याकडे होते. बुधवारी त्यांची भाजपा शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली.

निवडीनंतर शहर अध्यक्ष नरेंद्र काळे म्हणाले, आगामी महापालिका विधानसभा लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाने मला ही जबाबदारी दिलेली आहे. पक्षाच्या संघटनात्मक कामाला आणखी बळकटी देण्यासाठी आगामी काळात काम करणार आहे. पक्षाचे सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, बूथ प्रमुख, पन्ना प्रमुख, विविध आघाड्या, मोर्चे, समित्यांचे पदाधिकारी, सदस्य आणि सर्व भाजप कार्यकर्ते यांच्यासोबत पक्षाचे काम वाढविण्याचा प्रयत्न राहील. आगामी सर्व निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश मिळवून देण्यासाठी टीम म्हणून काम करणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील सरकारने आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राज्यातील सरकारने केलेली विकासकामे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पक्षाच्या माध्यमातून पोहोचवणार असल्याचेही नूतन शहर अध्यक्ष नरेंद्र काळे यांनी सांगितले. 
----------
प्रदेशाध्यक्षांसह लोकप्रतिनिधींनी केले अभिनंदन

नरेंद्र काळे यांची भारतीय जनता पार्टीच्या शहर अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खा. डॉ. जयसिध्देश्वर महास्वामी, माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख, जिल्हाध्यक्ष आ. सचिन कल्याणशेट्टी, माजी शहराध्यक्ष व भाजपाचे लोकसभा निवडणूक प्रमुख विक्रम देशमुख तसेच भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी नूतन शहर अध्यक्ष नरेंद्र काळे यांचे अभिनंदन केले.