हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून प्रा. अशोक निंबर्गी यांचा आमदार विजयकुमार देशमुखांना टोला
काँग्रेसच्या प्रा. निंबर्गी यांनी फुंकले रणशिंग ! वाचा !
सोलापूर : प्रतिनिधी
'शहर उत्तर हा हिंदुत्वाचा बालेकिल्ला माझ्यामुळे बनला आहे' असे कोणाला वाटत असेल तर त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला वगळून आगामी निवडणूक लढवून दाखवावी. मग सत्यतेची प्रचिती येईल असा टोला काँग्रेसचे नेते प्रा. अशोक निंबर्गी यांनी माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांना नाव न घेता लगावला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शहर उत्तर विधानसभेच्या शहरप्रमुखपदी महेश धाराशिवकर यांच्या निवडीबद्दल पक्षातर्फे आयोजिलेल्या सत्कार कार्यक्रमात प्रा. अशोक निंबर्गी यांनी जणू निवडणुकीचे रणशिंग फुंकले.
प्रा. निंबर्गी म्हणाले, शिवसेनेतून कितीही जण गेले तरी शिवसेनेचा गड भक्कम राहणार आहे. शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ हिंदुत्वाचा बालेकिल्ला आहे. हा विधानसभा मतदारसंघ हिंदुत्वाचा बालेकिल्ला होण्यासाठी अनेक शिवसैनिकांनी लाठ्या खाल्ल्या आहेत. परिणामी हा बीजेपीचा गड बनला आहे. 'माझ्यामुळे हा बालेकिल्ला बनला आहे' असे कोणाला वाटत असेल तर त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष वजा करून यंदाची निवडणूक लढवून दाखवावी. मग त्यांना खरी परिस्थिती कळेल असेही प्रा. निंबर्गी म्हणाले.
मूळचे भाजपचे असलेल्या आणि काही काळापूर्वीच काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या प्रा. अशोक निंबर्गी यांचे हे विधान आगामी निवडणुकीची दिशा कशी असेल हे ठरवण्यासाठी पुरेसे आहे. भाषणातून धर्मनिरपेक्षता आणि कृतीतून ' सॉफ्ट ' हिंदुत्वाची भूमिका घेतलेल्या काँग्रेसने आता हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आमदार विजयकुमार देशमुख यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांना अद्याप काहीसा अवधी असला तरी शहर उत्तर मतदार संघासह शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघांत निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत