आनंदाची बातमी ! जुळे सोलापूर रेल्वे पूलासाठी मोजणीचे काम सुरु

वाढीव बांधकाम केलेल्या घरांना देणार नोटिसा

आनंदाची बातमी ! जुळे सोलापूर रेल्वे पूलासाठी मोजणीचे काम सुरु

सोलापूर : प्रतिनिधी

जुळे सोलापूर येथील रेल्वे पूलाच्या मोजणीचे काम मंगळवारी दुपारी सुरू झाले. त्यामुळे नव्या पूल निर्मितीच्या प्रकियेला वेग आला आहे.

मंगळवारी दुपारी नगर अभियंता संदीप कारंजे, नगर रचनाचे सहायक संचालक केशव जोशी, नगर रचना विभागाचे उपअभियंता लक्ष्मण चलवादी, झेड. ए. नाईकवाडी, सहाय्यक अभियंता (रस्ते) शांताराम अवताडे, पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता चौबे, अवेक्षक नागनाथ बाबर, गणेश काकडे, भूमी मालमत्ता विभागाचे तांत्रिक सेवक सिद्राम तुपदोळकर, रस्ते विभागाचे अवेक्षक विष्णू कांबळे आदी अधिकाऱ्यांच्या पथकाने नव्याने होणाऱ्या पूलाच्या अनुषंगाने पाहणी केली.

नव्याने तयार होणाऱ्या पूलाची रुंदी २४.३८ मीटर असणार आहे. त्यानुसार मोजणी करून खुणा करण्याचे काम मंगळवारी सुरु करण्यात आले. खुणा केल्यानंतर त्या खुणांच्या आतील अतिक्रमण झालेली वाढीव बांधकामे काढण्यासाठी संबंधितांना नोटीस देण्यात येणार आहे. मुदतीच्या आत संबंधितांनी अतिक्रमणे काढून न घेतल्यास सोलापूर महानगपालिकेकडून ही अतिक्रमणे काढून पूल बांधकामासाठी जागा ताब्यात घेण्यात येणार आहे.

सध्याचा पूल पूर्ण पाडून नव्याने दुहेरी पूल बांधण्याचा प्रस्ताव रेल्वे विभागाने दिला होता. परंतु सोलापूर महानगरपालिका आयुक्त पि. शिवशंकर यांनी सध्याचा पूल पाडून नव्याने न बांधता त्याच पूलाला समांतर पूल बांधण्याची सूचना केली होती. त्यानुसार हे काम करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
--------------------------


उत्तरेच्या बाजूस नवा पूल होण्याची शक्यता

आसरा चौकाकडून जुळे सोलापूरकडे जाताना डाव्या बाजूने दुसरा पूल केल्यास तो तिरका होण्याची शक्यता आहे. तर त्याच्या विरुद्ध बाजूने दुसरा पूल केल्यास तो सरळ रेषेत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्याच्या पूलाला समांतर पूल उत्तरेच्या दिशेने करण्याचा निर्णय सोलापूर महानगरपालिकेकडून होणार असल्याची माहिती सूत्रांनी 'महाबातमी न्यूज पोर्टल' ला दिली.

-----------------------------

नव्या पूलाचे काम वेळेत होणे अपेक्षित

जुळे सोलापूर येथील पुलावरून होणारी सध्याची वाहतूक प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहे. परिणामी सध्याचा पूल वाहतुकीसाठी अत्यंत तोकडा पडत आहे. येथील वाहतूक सुरळीत होण्यासाठी प्रस्तावित असलेला नवा रेल्वे पूल लवकरात लवकर होणे अपेक्षित आहे. या पूलाच्या निर्मितीसाठी आम्ही प्रारंभापासून लढा देत आहोत. हा पूल लवकरात लवकर व्हावा याकरिता आम्ही शासन दरबारी जरूर पाठपुरावा करू.

--- परमेश्वर माळगे, सामाजिक कार्यकर्ते